उत्तमनगर : महाराष्ट्रात सर्वत्र केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून ईतर आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, मंगळवारी अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी उत्तमनगर परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. वाढत्या गर्दीमुळे लाॅकडाऊनचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.प्रशासन गर्दी रोखण्यासाठी निर्बंध लादत असले तरी नागरिकांनीही गर्दी टाळावी यासाठी वारंवार आवाहन करण्यात येत आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे लोकांना ऑक्सिजन बेड आणि रेमडेसिविरसाठी वणवण करावी लागत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातून निर्देश देण्यात आले असले, तरी बऱ्याच दवाखान्यात इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे.
उत्तमनगरमध्ये कोरोनाचा वाढता प्रसार आणि वैद्यकीय सुविधांची कमतरता आहे. संसर्ग झाल्यास रुग्णांच्या नातेवाईकांना संपूर्ण शहरात फिरावे लागत आहे. शिवणे, उत्तमनगर आणि आजूबाजूच्या परिसरात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे.
कोविड केंद्र उभारण्याची मागणी
शिवणे, उत्तमनगर परिसरात मोठे कोविड केंद्र उभारण्याची मागणी नागरिक करत आहेत.
स्थानिक नेते आणि प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून लोकांची होणारी गैरसोय कमी करावी आणि त्यांना मदत करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
फोटो - उत्तमनगर लाॅकडाऊन