पुणे : मागील काही वर्षांपासून सुरू असलेले हडपसर टर्मिनलचे काम पूर्ण होण्यास आणखी किमान दीड वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. टर्मिनलसाठी लागणाऱ्या जागेच्या ताब्यावरून आता उच्च न्यायालयात दावा सुरू आहे. त्यामुळे यावर्षीच हडपसर स्थानकातून लांबपल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.
पुणेरेल्वे स्थानकावरील लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचा ताण कमी करण्यासाठी हडपसर स्थानकाचा विस्तार करण्याला २०१६ मध्ये मान्यता मिळाली. तेव्हापासून हे स्थानक टप्प्याटप्याने विकसित केले जात आहे. नवीन इमारत, मार्गाचे दुहेरीकरण, फलाट आदी कामे सुरू होती. पण काही जणांनी जागेच्या ताब्यावरून पुण्यातील न्यायालयात दावा दाखल केला. त्याचा निकाल रेल्वेच्या बाजूने लागल्याने पुन्हा काम सुरू झाले. त्यामुळे यावर्षी हे स्थानक सुरू होणे अपेक्षित होते. पण संबंधित व्यक्तींनी त्याविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल केल्याने पुन्हा काम थांबले आहे. हा दावा निकाली निघाल्यानंतर काम सुरू होईल. त्यामुळे पुढील वर्षअखेरपर्यंत स्थानकाचे काम पुर्ण होईल. त्यासाठी निधीची कमतरता नाही, असे मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रेणु शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, पुणे रेल्वे स्थानकाच्या पुर्नविकासाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होण्यास लॉकडाऊनमुळे विलंब होणार आहे. मागील काही महिने मजुर न मिळाल्याने हे काम रेंगाळले आहे. तसेच काम पुर्ण होण्यास आणखी २ ते ३ वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.-------------प्रवाशांची महापालिकेने सोय करावीअनेक प्रवासी सध्या धावत असलेल्या रेल्वेगाड्यांसाठी काही तास आधीच येऊन पुणे स्थानकात थांबत आहेत. पण रेल्वेकडून केवळ तीन तास आधी येणाऱ्या प्रवाशांनाच विश्रांती कक्ष उपलब्ध करून दिला जात आहे. इतर प्रवाशांना आवारातही थांबविले जात नाही. या प्रवाशांसाठी महापालिकेने स्वच्छतागृह व तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करावी, असे पत्र महापालिकेला दिल्याचे शर्मा यांनी सांगितले.