विवेक भुसे-पुणे : २५ सप्टेंबर २०१९ हा दिवस दक्षिण पुण्यासाठी एक काळा दिवस ठरला होता. त्याच्या खुणा अजूनही या परिसरात दिसत असतानाच पुन्हा पावसाळा आला असताना एक चिंताजनक बातमी पुढे आली आहे. कात्रज ते सिंहगड रोड परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्रांच्या उभारणीला लॉकडाऊनचा फटका बसला आहे.
लॉकडाऊनमुळे स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्राच्या उभारणीचे काम होऊ शकले नाही. आता काम सुरु करण्यात आले असले तरी या पावसाळ्यात ते पूर्ण होईल का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. २५ सप्टेंबर २०१९ च्या काळ रात्री कात्रज परिसरात थोड्या वेळात प्रचंड पाऊस झाला़. कात्रजपासून सिंहगडपर्यंतच्या परिसरात महापूर आला होता. त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले़ तर मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. त्याचवेळी शहराच्या इतर भागातील पावसाचे प्रमाण कमी होते. या परिसरात पर्जन्यमापक केंद्र नसल्याने नेमका किती पाऊस पडला, याची कोणतीही अधिकृत मोजणी केले गेली नाही. त्यामुळे या भागात स्वयंचलिक पर्जन्यमापक केंद्र उभारण्याची मागणी केली गेली. हवामान विभागानेही त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली. शहराच्या वेगवेगळ्या भागात १० स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्र उभारण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला. त्याला केंद्र सरकारने मान्यताही दिली. मात्र, त्याचवेळी लॉकडाऊन सुरु झाले व हे केंद्र उभारणीचे काम ठप्प झाले.
याबाबत हवामान विभागातील उपकरण विभागाचे शास्त्रज्ञ के़. एन. मोहन यांनी सांगितले की, पुणे शहरातील १० ठिकाणे निवडण्यात आली आहेत. त्यापैकी काही जागेवर परवानगीही मिळाली आहे. काहींची परवानगी मिळणे अजून बाकी आहे. लॉकडाऊनमुळे परवानगी मिळालेल्या ठिकाणी स्वयंचलिक पर्जन्य मापन केंद्र उभारणीचे काम खोळंबले आहे. आता लवकरात लवकर ते काम पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी याबाबत सांगितले की, पुणे शहरात १० ठिकाणी स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यापैकी शिवाजीनगर, लोहगाव आणि पाषाण या तीन ठिकाणी जानेवारीपर्यंत स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्र उभारण्यात आली आहे. त्यावरुन त्या भागातील पावसाचा अंदाज देण्यास सुरुवात करण्यात येत आहे. मार्चमध्ये आणखी ४ ठिकाणी या केंद्राचे काम सुरु होणार होते. मात्र, लॉकडाऊनमुळे हे काम ठप्प झाले़ आता लॉकडाऊनमध्येही काम सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या पावसाळ्यात हे काम पूर्ण करुन ही केंद्रे कशी सुरु करता येईल, याचा आमचा प्रयत्न आहे............देशभरातील तालुका पातळीवर तसेच गावागावातील पावसाची अचूक नोंदणी व्हावी, यासाठी केंद्र सरकारने देशभरात १३५० स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्रे उभारणीचा मोठा कार्यक्रम आखला होता. मात्र, एका तपानंतरही त्यापैकी केवळ ३२३ केंद्रे आतापर्यंत उभारणी केली गेली आहे. त्यापैकी ६६ केंद्रे महाराष्ट्रात आहेत.