लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : दुकाने बंद ठेवूनदेखील कोरोना रुग्णसंख्या कमी होत नसल्याने गेल्या सात दिवसांपूर्वी प्रशासनाने जाहीर केलेल्या कडक लॉकडाऊनमध्ये आणखी सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मंगळवार(दि. ४) रात्री १२ वाजल्यापासून सुुरू झालेल्या सात दिवसांच्या कडक लॉकडाऊनची मुदत आज संपली. मात्र, पुन्हा सात दिवस हा लॉकडाऊन कायम राहणार आहे.
मंगळवारी (दि. ११) उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत निर्णय घेण्यात आला. साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनचा मार्ग वापरण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ मेच्या बैठकीत प्रशासनाला सूचना केल्या होत्या. त्यानुसार ५ मे रोजी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. ११ ते १८ मे रोजी रात्री १२ पर्यंत कडक निर्बंध पूर्वीप्रमाणेच लागू राहतील. बारामती शहरासह तालुक्यातील हॉस्पिटल, दवाखाने व औषध विक्रीची दुकाने वगळून सर्व आस्थापना, दुकाने पुढील ७ दिवस बंद राहतील. फक्त दूध विक्री सकाळी ७ ते ९ पर्यंत सुरू राहील. तसेच अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ पर्यंत घरपोच सेवा चालू राहील, असे आदेश प्रांताधिकारी कांबळे यांनी दिले.
या वेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता फरांदे, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पोलीस निरीक्षक बारामती शहर नामदेव शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष सभाजी होळकर, गटनेते सचिन सातव, भाजपचे तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे, व्यापारी असोसिएशनचे नरेंद्र गुजराथी, संजय सोमाणी, विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, मनसेचे अध्यक्ष अॅड. सुधीर पाटसकर, धनंजय जामदार, काॅंग्रेसचे अॅड. अशोक इंगुले, शिवसेनेचे अॅड. राजेंद्र काळे, हॉटेल संघटनेचे अध्यक्ष प्रवीण अहुजा, भाजपचे शहर अध्यक्ष सतीश फाळके, नरेंद्र मोता, वैभव बुरूंगले, स्वप्निल मुथा, सनी गालिंदे, अॅड. गिरीष देशपांडे, मधुकर मोरे आदी उपस्थित होते.