लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक गोष्टी सोडता इतर सर्व व्यवहार ठप्प आहेत. बाजारात पेठेतील व्यापाऱ्यांपासून फेरीवाल्यांचे अर्थचक्र थांबले आहे. गेल्या वर्षभरापासून व्यापारी कोरोनाविरोधात लढा देत आहेत, त्यामुळे आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला आहे. व्यापारी थकला तर अर्थव्यवस्था मंदावेल. अशी भीती शहरातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली, असून करात सूट मिळण्याची मागणी केली आहे.
बाजारपेठेतल्या दैनंदिन आर्थिक उलाढालीमुळे अर्थचक्र फिरते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे चक्र अडखळले आहे. वर्षभरातले लॉकडाऊन आणि कडक निर्बंध यामुळे खेळणी, प्लॅस्टिकच्या वस्तू, सजावटीचे साहित्य, पत्रावळी, शोभेच्या वस्तू, कपडे तसेच सणवारांनुसार मोठ्या प्रमाणात विक्री होणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तूंचे व्यापारी, उत्पादक विक्रेते आर्थिक संकटात आहेत. किरकोळ विक्रेत्यांची दुकाने बंद असल्याने मालाला मागणी नाही. आहे तो माल दुकानात आणि गोडाऊनमध्ये पडून आहे.
उत्पन्न थांबले असले, तरी दैनंदिन खर्च फार कमी झालेले नाहीत. जागा भाडे, बँकेचे हप्ते, विजेचे बिल, घरगुती खर्च, सरकारी कर हे खर्च सुरूच आहे. त्यामुळे व्यापारी आता थकू लागला आहे. सरकार त्याला कोणत्याही प्रकारे मदत करत नसले, तरी किमान करात सूट मिळावी. तसेच व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांना आर्थिक आधार देण्याची आता गरज आहे. असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
सांगली, पंढरपूर, भिगवण, इंदापूर, वाई, पाचगणी, महाबळेश्वर आदी भागातील ६० टक्के किरकोळ विक्रेते शहरातून माल खरेदी करतात. पुण्याच्या उपनगरातील सुमारे ८० टक्के विक्रेते मध्यवस्तीतील बाजारपेठेतून खरेदी करतात. हातावर पोट असलेले, फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेते, छोटे दुकानदार आर्थिक संकटात आहेत. अनेकांनी व्यवसाय बंद केले आहेत. त्यांना पाठबळ देण्याची गरज असल्याचे व्यापारी सांगतात.
कोट
व्यापाऱ्यांचा पाय खोलात
“व्यापारी कधी नव्हता, तेवढा आता आर्थिक संकट सापडला आहे. व्यापाऱ्यांकडे आता सहानुभूतीने बघण्याची वेळ आली आहे. व्यापारी नेहमीच आर्थिक संकटांशी लढला आहे. मात्र आत्ताची वेळ खूपच वाईट आहे. अनेकांच्या भिशा ठप्प आहेत. पैसा खेळत नाही आणि असलेला धंद्याच्या गुंतवणुकीत अडकून पडला आहे. सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.”
- सुरेश जैन, अध्यक्ष, पुणे शहर व्यापारी असोसिएशन.