पुणे : दारू पिण्याचे प्रमाण वाढले की हिंसाही आपोआपच वाढते. दारूची दुकाने सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे महिला अत्याचारांमध्ये वाढच होणार आहे. त्यामुळे हा निर्णय हा अत्यंत चुकीचा असून, या निर्णयाला आमचा विरोध आहे. शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी महिला संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
लॉकडाउनच्या काळात घरगुती हिंसाचाराच्या तक्रारीत वाढ झाली असून, राष्ट्रीय महिला आयोगाकडे २६ एप्रिलपर्यंत देशभरातून ५८७ तक्रारी आल्या आहेत. यात दारूची दुकाने सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे भर पडण्याची भीती महिला संघटनांनी व्यक्त केली.दारूडा व्यक्ती फिजिकल डिस्टन्सिंग कसे पाळू शकणार? दारू मिळविण्यासाठी मारामाऱ्या सुरू होतील. दारू विक्रीमधून सरकारने महसूल मिळविण्याचा घेतलेल्या निर्णयातून अनेक प्रश्न निर्माण होतील. या निर्णयाला आमचा विरोध आहे. - साधना दधिच, नारी समता मंच
सरकारचा निर्णय चुकीचा आहे यात दुमत नाहीच. पण केंद्र सरकार राज्याला कोरोना काळात मदत करीत नाही. त्यामुळे राज्याला महसूल वाढविण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला आहे. - किरण मोघे, सामाजिक कार्यकर्त्या.दारू पिऊन ही लोक कुटुंबातील महिलांसह इतर सदस्यांना त्रास देणार. यातच घरगुती हिंसाचारामध्येही वाढ होणार. ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’मुळे अपघात झाल्यास रूग्णालयांमध्ये रूग्णाला ठेवण्यासाठीही जागा नाही, अशी परिस्थिती आहे. यामुळे सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा. - डॉ. मुक्ता पुणतांबेकर, संचालिका, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र.