पुणे : लॉकडाऊन अजून जाहीर झालेला नाही, पण तो होईल या भीतीनेच अनेकांना आत्ता कापरे भरले आहे. मागचा अनुभव गाठीशी असल्याने लॉकडाऊन म्हणजे काम उद्योग व्यवसाय बंद, उत्पन्न बंद याची पक्की खात्री बहुतेकांना आहे.
मागील वर्षी मार्च महिन्याच्या याच काळात लॉकडाऊन जाहीर झाला. तोही थेट २१ दिवसांचा. सुरूवातीला फारसे गंभीरपणे कोणीच घेतले नाही, पण कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली, मृत्यू पडलेल्यांची माहिती जाहीर होऊ लागली आणि प्रशासन जागे झाले. उद्योजकांपासून ते हातावरचे पोट असलेल्या गरीब कष्टकऱ्यापर्यंत सर्वांनाच याच्या झळा बसल्या. त्यामुळेच पुन्हा कोरोना रूग्ण वाढू लागल्यावर पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली तरी बहुतेकांच्या पोटात गोळा आला आहे.
चौकट
नियम पाळणार नाहीत त्यांना धरा
“मंडई, मोठ्या घरची लग्नकार्ये, सार्वजनिक कार्यक्रम या ठिकाणी नियमांचे पालन होत नाही व प्रशासनही त्यावर काही करत नाही. रूग्ण वाढले की २५ ते ३० जण असलेल्या हॉटेल, रेस्टॉरंटना टारगेट करतात हे अयोग्य आहे. पुण्यात आज ६ हजार लहानमोठी रेस्टॉरंट आहेत, किमान ५ कर्मचारी धरले तरी ३ लाख गरीब कर्मचारी या लॉकडाऊनने बेरोजगार होतील. एकल राहणाऱ्या, जेवणासाठी हॉटेलशिवाय दुसरा पर्याय नसलेल्या काही लाखजणांचे हाल होतील त्याचे काय करणार आहे प्रशासन? कर्जाचे ओझे घेऊन आम्ही कसातरी व्यवसाय करतो आहोत, तर पुन्हा बंद नको. आम्ही नियम पाळतोच, गर्दीला ते काटेकोरपणे पाळायला लावा.”
गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँन्ड हॉटेलिअर्स असोसिएशन.
चौकट
“अनेकांचे व्यवसाय मागच्या लॉकडाऊनमध्ये बंद झालेत. बाजारपेठ पूर्ण कोसळली होती. बंद म्हणजे फक्त दुकानदार नाही तर कामगारही बेरोजगार होतात. मालक त्यांना किती दिवस पगार देईल? प्रशासन लॉकडाऊन जाहीर करेल तर फार मोठी चूक होईल. त्याऐवजी मास्क लावणार नाहीत, ताप सर्दी असताना फिरतील, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून राहतील अशांवर कडक कायदेशीर कारवाई करा. त्यात दुकानदार असतील तर त्यांच्यावरही कारवाई करा, पण लॉकडाऊन करू नका अशी आमची व्यापारी असोसिएशनची विनंती आहे.”
अँड. फत्तेचंद रांका, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन, पुणे.
-----