पुणे: दोघांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले... दोघांचेही हे दुसरे लग्न होतं... तो व्यवसायाने ‘बिझनेसमन’... पण त्याचे आॅफिसमधल्या मुलीशी अफेअर असल्याचा तिचा संशय होता. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि या दरम्यान लॉकडाऊन जाहीर झाले. लॉकडाऊनकाळात ती भावाकडे राहात होती. त्यावेळी तिला जाणीव झाली की शेवटी आपले घर हे आपलेच असते. तिने त्याच्याबरोबर नांदण्याची तयारी दर्शविली आणि त्यानेही ‘या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव खुले आहेत,’ असे म्हणत प्रतिसाद दिला अन् कोरोना लॉकडाऊनमुळे दोघांचा संसार नव्याने फुलला.
राहुल आणि अंजली (नावे बदलली आहेत) या दोघांची कहाणी ‘हटके’ अशी आहे. एकाच समाजातील असल्यामुळे दोघांनी पाच वर्षांपूर्वी लग्न केले. त्याला तीन मोठी मुले आहेत. तो बिझनेसमन असल्याने त्याच्याच आॅफिसमध्ये असलेल्या मुलीशी त्याचे अफेअर आहे, असा तिचा संशय होता. तिने त्याचे काहीही न ऐकून घेता रागाच्या भरात घर सोडले. त्याच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल केली. त्याची तिच्याबरोबर नांदायची इच्छा होती. मात्र तिच्या संशयखोर स्वभावामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी २०१९ मध्ये सामंजस्याने घटस्फोटासाठीचा दावा अॅड. अमित राठी यांच्यामार्फत न्यायालयात दाखल केला. एप्रिल २०२० मध्ये त्यांच्या घटस्फोट अर्जावर सुनावणी होऊन आदेश दिला जाणार होता. पण मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामध्ये दोघांची मने एकमेकांकडे वळली. दोघांनी संपर्क साधून एकत्र राहाण्याचा विचार केला. त्यामुळे घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला.
-------------------
आॅफिसमधल्या मुलीने बिझनेस स्थिरस्थावर करण्यास खूप मदत केली आहे. त्यामुळे मी तिला कामावरून काढून टाकू शकत नाही. ती मला मुलीसारखी आहे असे सांगून त्याने तिचा संशय दूर केला. लॉकडाऊनच्या काळात घटस्फोटाच्या मार्गावर असलेले असलेले हे जोडपे पुन्हा एकत्र आले.
- अॅड. अमित राठी
-------------