लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “वयाची अट ना ठेवता सर्व नागरिकांना कोरोनावरील लस सरसकट दिली जावी,” अशी मागणी राज्याचे कोरोना साथ विषयक सल्लागार डॉ. सुभाष साळूंके यांनी केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आता लॉकडाऊन हा पर्याय नाही, त्याबरोबरच रात्रीच्या लॉकडाऊनचाही काहीही फायदा होत नाही, असेही डॉ. साळुंखे यांनी स्पष्ट केले.
“लोकांनी निर्बंध न पाळल्यामुळे कोरोना पसरत आहे. मास्क घालणे, सुरक्षित शारीरिक अंतर पाळणे या निर्बंधांची आवश्यकता आहे,” असे ते म्हणाले. कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण आढळल्याच्या प्रसंगाला मंगळवारी (दि. ९) एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. साळुंखे ‘लोकमत’शी बोलत होते.
कोरोनाचे आत्तापर्यंत २८०० म्युटेशन झाले आहेत. पण त्यामुळे संसर्ग होण्याचा पद्धतीत काही बदल झालेला नाही, असे निरिक्षण डॉ. साळुंखे यांनी नोंदवले. ते म्हणाले की, शाळा आणि महाविद्यालयांमुळे कोरोना वाढू शकतो. त्यामुळे शाळा-महाविद्यालये आणखी जास्त काळ बंद ठेवण्याची आवश्यकता आहे. सरकार आता लॉकडाऊन करणार नाही पण लोकांनी नियम पाळले तरच परिस्थीती बदलेल, आता ‘कोरोना’सह जगण्याची सवय करायला पाहिजे. डॉ. साळुंखे यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे -
चौकट
वाढत्या रुग्णसंख्येविषयी
-दीड ते दोन महिन्यांपूर्वी लोकांनी कोरोना गेला अशी समजूत करून घेतली आणि तसे वागायला सुरुवात केली. अर्थात हे आर्थिक कारणांसाठी असले तरीही नियम पाळले गेले नाहीत. निवडणुका झाल्या, शाळा-महाविद्यालये सुरू झाली पण कोरोना विषाणू गेलेला नव्हता.
-सुरुवातीला वाटत होते की हे म्युटेशन आहे का? पण तसे काही गंभीर म्युटेशन नसल्याचे स्पष्ट झालं. आत्ताचा जो स्ट्रेन आहे ते २८ हजारावे म्यूटेशन आहे. पण व्हायरसची तीव्रता आणि प्रसार होण्याची क्षमता ही बदललेली नाहीये हे लक्षात आले. अर्थात सध्या लोक घरात देखील विलगीकरण नीट करत नाहीत. त्यामुळे संपूर्ण कुटुंब ‘पॉझिटिव्ह’ होत आहे.
चौकट
चाचण्या वाढवा
सध्याची परिस्थिती लक्षात घेता पुन्हा खासगी डॉक्टरांकडून लोकांना ट्रॅक करून चाचण्या वाढवणे गरजेचे आहे. आता पूर्ण लॉकडाऊनला कोणाचीच सहमती असणार नाही. पण लोकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. शक्य असेल तर लग्नकार्ये पुढे ढकला. शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा विचार काही महिने तरी करू नका. जिथे लोक एकत्र येतात त्यावर निर्बंध असले पाहिजेत. रात्रीच्या संचारबंदीचा फार फायदा होणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले तसे कोविडचा एंडगेम नाही, तो पँन्डेमिक न राहता एन्डेमिक म्हणून राहील.
चौकट
प्रत्येकाला टोचा लस
लसीकरण झाले म्हणजे निश्चित व्हाल असे नाही तर त्यानंतरही नियम पाळणे गरजेचे आहे. आपल्या देशात ३० कोटी लोकांचे लसीकरण करावेच लागेल तरच त्याचा फायदा होईल. लसीकरणासोबतच कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. गेल्या ५ ते ६ दिवसांपासून केंद्रीय आरोग्य संचालकांकडे मी आग्रह करतो आहे की आता सगळ्यांनाच लसीकरणाची परवानगी देणे आवश्यक आहे. आपल्याकडे वय वर्षे १८ च्या आत लसीकरणाची परवानगी नाही. पण त्यावरील सर्वांचे लसीकरण येत्या महिनाभरात होणे गरजेचे आहे.