लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या ‘लॉकडाऊन नको’ या वक्तव्याकडे लक्ष न देता त्यासंबंधीचा निर्णय तज्ज्ञांनाच घेऊ द्यावा, असे मत खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.
महापौरांनी त्यांच्या वक्तव्याला कसलाही शास्त्रीय आधार दिलेला नाही. कोरोनाची पुण्यातील वाढती रूग्णसंख्या हा राजकारणाचा विषय नाही. न्यायालयानेही याची गंभीर दखल घेत गरज पडल्यास पुण्यातील रूग्ण मुंबईत हलवण्याचा आदेश देऊ असे म्हटले, याकडेही खासदार चव्हाण यांनी लक्ष वेधले आहे.
कोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे सांगितले. इतके असताना महापौर कशाच्या आधारावर ‘लॉकडाऊन नको’ असे म्हणत आहेत, असा सवाल खासदार चव्हाण यांनी केला. पुण्यात रुग्णसंख्या कमी होत असली तरी हा वेग अतिशय कमी आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन अतिशय धोकादायक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. तज्ज्ञांचं मत विचारात घेऊनच योग्य तो निर्णय घ्यावा, असे त्या म्हणाल्या.