लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना निर्मूलनासाठीच्या टाळेबंदीच्या घोषणेने ताठ कणा ठेवून जगणाऱ्या लाखभर महिलांच्या रोजगारावर दुसऱ्यांदा संक्रांत आली आहे. रोजच लढणाऱ्या या महिला हातातील काम गेल्याने कोसळून पडल्या आहेत.
शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार व आसपासचे ढाबे यांची एकूण संख्या दहा हजारांपेक्षा जास्त आहे. याशिवाय अनधिकृत वेगळे. तिथे पोळी, भाकरी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी चार-पाच याप्रमाणे ५० हजार महिलांना रोजगार मिळतो. त्याचबरोबर पुण्यात किमान चार लाख मुले वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थामधून शिकतात. त्यांच्यासाठी संस्थाच चालवत असणाऱ्या मेस, गल्लोगल्ली सुरू असलेल्या खानावळी याठिकाणीही किमान ५० हजार महिला काम करतात.
यातल्या बहुतेकजणी निराधार आहेत. काहींचा नवरा असून नसल्यासारखा आहे. काहींनी पतीनिधनामुळे या कामाची कास धरली आहे. एकच साम्य सगळ्या जणींमध्ये आहे व ते म्हणजे गरज म्हणून, मुलाबाळांना शिक्षण देऊन वर आणायचे म्हणून त्या हे काम करत आहेत. त्यांचे हे कामच टाळेबंदीने हिरावून घेतले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट बंद म्हणून यांचे काम बंद, शैक्षणिक संकुले बंद, म्हणून मेस बंद व मुले आपापल्या गावी गेली म्हणून खानावळीही बंद. कामच नाही तर आता जगण्यासाठी करायचे काय असा प्रश्न या महिलांपुढे आहे. यांना काम देणारे मालकही फार श्रीमंत नाहीत. यांच्या श्रमावर थोडेफार पैसे कमवतात. फार तर महिनाभर यांना सांभाळू शकतात. तसे काहींनी केलेही, पण आता मात्र सतत टाळेबंदीची टांगती तलवार राहणार याची खात्री पटल्यामुळे की काय त्यांच्यातील अनेकांनी व्यवसायच बंद करण्याचे जाहीर केले आहे.
चौकट
काय करायचे हा प्रश्नच
“पती गेल्यावर आजपर्य़ंत कोणासमोर मदतीसाठी पदर पसरला नाही. या कामातून चार पैसे मिळायचे, त्यातूनच घर चालवायचे. आता तेही नाही. काय करायचे हा प्रश्नच आहे.”
-गंगाबाई जाधव.
चौकट
“मागच्या वर्षी ९ महिने आमची मेस बंद होती. आत्ताच कुठे सुरू झाली होती. काम सुरू झाल्याचा आनंद होता, तोच आता पुन्हा सगळे बंद झाले. काय चालले आहे तेच कळेनासे झाले आहे.”
-पवार मावशी
चौकट
चपाती-भाकरीचे अर्थकारण
एका महिलेचा महिन्याचा पगार : ९ ते १० हजार रूपये
दिवसाला : ३०० रूपये
कामाची वेळ : सकाळी ११ ते ३, सायंकाळी ६ ते रात्री उशिरापर्यंत.
घरून चपात्या करून दिल्या तर :
एका चपातीला ३ ते ५ रूपये, विकली जाते १० ते १२ रूपयांना
विद्यार्थी, नोकरदार यांना घरी येऊन पोळीभाजी करून देणे : महिना १० ते १२ हजार रूपये (वर्क फॉर्म होममुळे तेही बंद)