लोणावळा : शहरात मागील काही दिवसांपासून खुलेआम विना परवाना झाडांची कत्तल केली जात आहे. नांगरगाव येथील ओमेगा सोसायटीच्या मोकळ्या जागेत सुरक्षा भिंतीच्या लगत लावण्यात आलेली जवळपास आठ ते दहा झाडे शनिवार व रविवारी सोसायटीकडून तोडण्यात आली आहेत, अशी तक्रार देव वाळंज व सुमित भाटिया यांनी लोणावळा नगर परिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे दिली. नगर परिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य हर्षल होगले व नगर परिषद कर्मचारी यांनी सदर तोडलेल्या झाडांची पाहणी करत पंचनामा केला आहे.शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात वृक्ष लागवड करण्याची नितांत गरज असताना शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचे समोर आले आहे. मागील काळात रेल्वेचा भाग असलेल्या बारा बंगला व आगवाला चाळ, तुंगार्ली, वलवण भागात मोठ मोठी झाडे तोडण्यात आली होती. झाडे तोडणारे एक रॅकेट तर खुद्द नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी रंगेहात पकडले होते. तद्नंतर देखील झाडांची तोड ही सुरूच आहे. लोणावळा नगर परिषदेचा उद्यान विभाग व वृक्ष समितीचे या प्रकारांकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे़ तसेच वन विभागाचे अधिकारी योग्य प्रकारे लक्ष देत नसल्याने सर्रासपणे विना परवाना वृक्षतोड केली जात आहे. वाढत्या नागरीकरणाकरिता लोणावळा व खंडाळा भागात वृक्षतोड केली जाते. मात्र नव्याने झाडे लावली जात नसल्याने निसर्गाचा समतोल पुरता ढासळू लागला आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणवळा शहराचा पारा आता ३५ अंशाच्या खाली उतरण्याचे नाव घेत नसल्याने खरेच या शहराला थंड हवेचे ठिकाण म्हणायचे का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. शहराचा हा नावलौकिक व दर्जा ठिकविण्यासोबत शहराचे वातावरण थंड व अल्हाददायी ठेवण्याकरिता शहरात सुरू असलेली वृक्षतोड थांबविण्यासोबत नवीन झाडे लावण्याची व ती जगविण्याची व्यापक मोहीम नगर परिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने हाती घेणे गरजेचे असल्याचे मत अनेक जाणकार व्यक्त करत आहेत.
लोणावळ्यात झाडांची विनापरवानगी कत्तल, वृक्ष प्राधिकरणाकडे तक्रार; तापमान वाढल्याने नागरिक हैैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 6:03 AM