पुणे : लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजले असून जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. त्यात पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाचे मतदान येत्या २३ एप्रिल रोजी तर मावळ व शिरूर मतदारसंघाचे मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणूकीची सर्व तयारी पूर्ण केली आहे.आचारसंहितेच्या निमवालीचे काटेकोर पालन करणे गरजेचे असून या नियमावलीचे उल्लंघन करणा-यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी रविवारी सांगितले.केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे रविवारी सायंकाळी लोकसभा निवडणूकीची घोषणा करण्यात आली.त्यानंतर जिल्ह्यातही आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे जिल्ह्यातील पुणे,बारामती ,मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नवल किशोर राम बोलत होते. यावेळी ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील, निवडणूक अधिकारी मोनिका सिंह आदी उपस्थित होते.नवल किशोर राम म्हणाले,जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्यात पुणे व बारामती या दोन मतदार संघात 23 एप्रिल रोजी मतदान होईल.पुणे लोकसभा मतदार संघात सध्या २० लाख २४ हजार ७३१ मतदार असून या मतदार संघात १ हजार ९४४ मतदान केंद्र आहेत. तर बारामती मतदार संघात २० लाख ७७ हजार २७८ मतदार असून बारामतीत २ हजार ३०३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तसेच जिल्ह्यात मावळ मतदार संघात सर्वाधिक २२ लाख २७ हजार १३३ मतदार असून शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये २१ लाख ११ हजार ४६५ मतदार आहेत. मावळात पुणे जिल्ह्यासह पनवेल, कर्जत, उरण येथील मतदान केंद्रांचा समावेश आहे. मावळात एकूण २ हजार ४०५ मतदान केंद्रावर तर शिरूरमध्ये २ हजार २२७ मतदान केंद्रावर मतदान होईल.नवल किशोर राम म्हणाले, आचारसंहितेच्या काळात कायदा सुव्यवस्था राखली जाणार आहे.त्यासाठी पोलीस व इतर यंत्रणांची मदत घेतली जाणार आहे. सर्व सामान्य नागरिकांना सुद्धा निवडणूक काळात चूकीच्या घटनांचे चित्रिकरण किंवा छायाचित्र ‘सी- व्हिजल’ या मोबाईल अॅपवर टाकता येणार आहे. या अॅपवर नागरिकांकडून केल्या जाणा-या तक्रारीची दखल तात्काळ घेतली जाईल. तसेच संबंधित घटनेची चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.शासकीय कामे थांबणारआचार संहिता लागू झाल्यामुळे आता कोणत्याही शासकीय योजनांची घोषणा करता येणार नाही.कोणत्याही प्रकारची शासकीय कामे होणार नाहीत. शासनाच्या कामाच्या निविदा किंवा जाहिराती प्रसिध्द होणार नाही.शासनाच्या बांधकाम विभागाची कामे थांबविली जातील.मतदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणता येणार नाही.लोकप्रतिनिधी शासकीय अधिका-यांबरोबर बैठक घेऊ शकत नाही.आचार संहितेचा भंग होणारे पोस्टर लावता येणार नाहीत.निवडणूक काळात होणाऱ्या गैरप्रकारांची तक्रार सी व्हीजल अॅपद्वारे घेतली जाईल. तथ्थ तपासून १०० मिनिटाच्या आत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला जाईल. निवडणूकी दरम्यान शस्त्र जमा करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात पैसे,शस्त्र,किंवा पैसे आणले जाऊ नयेत यासाठी जिल्ह्यात सुमारे 41 ठिकाणी चेकपोस्टवर तपासणी केली जाईल.- संदीप पाटील, ग्रामीण पोलिस अधिक्षक
Lok Sabha Election 2019: पुणे जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 3:08 AM