'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 09:37 AM2024-05-07T09:37:01+5:302024-05-07T09:46:21+5:30
Baramati Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होतं आहे. राज्यातील ११ मतदारसंघात मतदान होत आहे.
Baramati Lok Sabha Election 2024 ( Marathi News ): लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होतं आहे. राज्यातील ११ मतदारसंघात मतदान होत आहे. यात बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी अजित पवार यांच्या या निर्णयावर त्यांच्या आईही नाखूश असल्याचा आरोप करण्यात आला होता, या आरोपाला अजित पवार यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे.
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
आज सकाळीच अजित पवार मतदानासाठी दाखल झाले, यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्रीआशाताई अनंतराव पवार, पत्नी सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. अजित पवार म्हणाले, सगळ्या निवडणुका मी महत्वाच्या मानतो. माझ्या घरात पवार परिवारात सगळ्यात मोठी माझी आई आहे, माझी आई माझ्यासोबत असल्यानंतर बाकीचा काय विचार करता, मेरी माँ मेरे साथ है, असंही अजित पवार म्हणाले.
"माझ्या भावाने दहा वर्षापूर्वी मिशी काढली, आता तो मी मिशी काढण्याची वाट बघत आहे. अजून काय काय वाट बघतोय ते मी पाहणार आहे, असा टोलाही अजित पवार यांनी श्रीनिवास पवार यांना लगावला. रोहित पवार यांच्या आरोपावर बोलताना अजित पवार म्हणाले,पैसे त्यांनी वाटले आहेत, असले आम्ही कधीच केलेले नाही.
बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान, अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती.यावेळी त्यांनी पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई नाराज झाल्याचेही त्यांनी सांगितले. 'माझा मुलगाही मला प्रिय आहे आणि दीरही तितकेच प्रिय आहेत. मला तुमच्या दोघांच्या लढाईत पडायचे नाही, असे अजितदादांच्या आईने सांगितले आणि आई बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेली, असा आरोप केला होता. दरम्यान, आज अजित पवार यांनी या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.