पुणे : येत्या लोकसभा निवडणुकीत तरुण मतदारांची संख्या मोठी आहे. अनेक मतदारसंघांत तर तरुणांचा कल ज्या उमेदवाराकडे असेल त्यांचा विजय नक्की मानला जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षांनी राज्यात काही ठिकाणी तरुण उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघही याला अपवाद नाही. या मतदारसंघातही नवमतदारांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील नवमतदार तरुण-तरुणींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी त्यांच्या मतदारसंघात कोणत्या सुधारणा झाल्या पाहिजेत, यावर स्पष्ट मते मांडली.
पायाभूत सुविधांकडे लक्ष देणे गरजेचे आहेच; पण तो विकास करताना पर्यावरणाचा ऱ्हास झाला नाही पाहिजे, असे मत अनेकांनी व्यक्त केले. यावरून पर्यावरणाचा मुद्दा तरुणाईला चांगला उमगलेला दिसतो. वाहतूककोंडी, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांवरील खड्डे, वाढते प्रदूषण यांचा तरुणाईला त्रास होतोच; पण त्यावर नुसती टीका करण्याऐवजी तरुणाई त्यावर मार्गही सुचवते आहे. नगररचना विभाग यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे त्यांना समजते.
वाढत्या तंत्रज्ञानाचे फायदे-तोटे, त्यावरील उपाय आणि चांगल्या आंतरराष्ट्रीय संबंधांमुळे नोकऱ्यांमधील वाढ याचीही तरुणवर्गाला चांगली समज आहे. महत्त्वाचे म्हणजे मोबाइलच्या जमान्यात वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी सरकारने काहीतरी करावे, असे तरुणाईला वाटते, ही स्वागतार्ह बाब आहे.
सिंहगड रोडवरील खाऊ गल्ली :
अनु कोंगरे म्हणाली, या भागातील आरोग्य व्यवस्था चांगली झाली पाहिजे. समाजातील सर्व गरीब लोकांना आणि उपचारासाठी पैसे नसणाऱ्यांना सरकारने योग्य दरात सुविधा दिल्या पाहिजेत. नागरिकांना मिळणाऱ्या सुविध व्यवस्थितरित्या मिळत आहेत का नाही याकडेही लक्ष दिले पाहिजे. आज जर आपण कोणत्याही सरकारी दवाखान्यात गेलो तर तिथे उपचार मिळण्यास तासंतास रांगेत उभे राहावे लागते. तरीही तिथे मिळणाऱ्या उपचाराचा दर्जा साधारण असतो. सरकारी रुग्णालयातील गैरसोईंमुळे अनेक गरिबांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. याकडे प्रशासनाने आणि सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. सरकारच्या आरोग्याबद्दलच्या जेवढ्या योजना आहेत त्या व्यवस्थित चालत आहेत का नाही याकडेही लक्ष दिले पाहिजे. तसेच आधुनिक उपचाराचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे असंही अनु म्हणाली.
मनीषा भालेराव म्हणाली, कोणत्याही शहराच्या विकासासाठी तिथल्या पायाभूत सुविधा महत्त्वाच्या असतात; पण त्याअगोदर ती शहरे वसताना किंवा नवीन शहरे तयार होताना काही शास्त्रीय नियोजन असणे महत्त्वाचे आहे. पुणे शहरात नेमका त्याचाच अभाव आहे. कोण कुठेही गाड्या लावतंय, कुठेही बाजार भरतो, सणांच्या वेळी कोणतेही नियम न पाळल्याने अख्खे शहर थांबते. याला शिस्त लावणे सहज शक्य आहे, त्यांना व्यवस्थित जागा उपलब्ध करून दिल्या तरीही ही समस्या काही प्रमाणात तरी सुटू शकते, असे मनीषाला वाटते.
प्राजक्ता वाघ म्हणाली की, रात्री फिरायला भीती वाटते. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण असले पाहिजे. महिला सबलीकरणाचा मुद्दा नुसता कागदोपत्री न ठेवता प्रशासनाने त्यासाठी ठोस कारवाई केली पाहिजे.
मंदार भाेसले म्हणाला, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करावी. या वाहतूक व्यवस्थेच्या वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहन द्यावे. आपल्या पुणे शहरातून दोन नद्या जातात. सांडपाण्यावर योग्य प्रक्रियेनंतरच ते नदीत सोडावे; तसेच विकसित देशाप्रमाणे शहरातील नद्यांमधून वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.
लॉ कॉलेज :
कॉलेजच्या कँटीनमध्ये बसलेले चार तरुण आणि पाच तरुणींची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बेधडक मते मांडली. प्रसाद कांदे म्हणाला की, मी कात्रजपासून कॉलेजपर्यंत येताना जेवढा त्रास मला होताे तो कमी झाला पाहिजे. रस्त्यांवरील ठिकठिकाणच्या वाहतूककोंडीने वैताग आला आहे. रस्त्यावर कधी खड्डा येईल सांगता येत नाही. मागील आठवड्यात स्वारगेट परिसरात रस्त्यावरील खड्ड्यामुळे माझा अपघात झाला. त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधा चांगल्या झाल्या पाहिजेत, अशी मला अपेक्षा आहे. त्याच्याच मित्रांनी लगेच सांगितले की, कोणत्याही सार्वजनिक कामाला तज्ज्ञ नागरिकांची दक्षता समिती नियुक्त करायला हवी. त्यांच्या देखरेखीखाली अशी कामे होतील, याप्रकारची व्यवस्था तयार करणे गरजेचे आहे.
तिथेच बसलेल्या भाग्यश्रीने पाण्याचा मुद्दा मांडला. तिच्या भागात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे आजार पसरत आहेत. जे पाणी मिळते ते स्वच्छ असावे, एवढी अपेक्षा तिने व्यक्त केली. असे करणे नव्या तंत्रज्ञानामुळे कितीतरी सोपे आहे; मात्र तशी इच्छाशक्ती कोणी दाखवत नाही, यासाठी नागरिकांचाच एखादा दबावगट तयार व्हावा, त्याला अधिकृतता द्यावी, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.
जे.एम. रस्ता :
जे.एम. रस्त्यावर एका टपरीवर चहा पीत काही तरुण थांबले होते. गप्पा निवडणुकीच्याच सुरू होत्या. कोण येणार? कोण पडणार? ते जाऊद्या, काय व्हायला हवे ते सांगा? असे त्यांना विचारले. त्यावर अविराज खरात म्हणाला की, देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध वृद्धिंगत झाले पाहिजेत. भांडत राहण्यात आता अर्थ नाही. सहकार्याची भूमिका ठेवायला हवी. त्यामुळे तरुणांना विदेशात नोकरी आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. देशात अद्ययावत, नवीन तंत्रज्ञांनासंबंधीचे शिक्षण सुरू केले पाहिजे. पुढची किमान काही वर्षे तरी याच प्रकारच्या शिक्षणावर भर हवा.
प्रशांत काकडे म्हणाला की, सध्या तरुणाई मोबाइलच्या आहारी जाताना दिसत आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी शहरात अभ्यासिका उपलब्ध करून द्यायला हव्यात. रोजगार वाढविण्यासाठी मोठ्या औद्योगिक कंपन्या सुरू झाल्या पाहिजेत.
शिवाजीनगर परिसर :शिवाजीनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये एक ग्रुप वडापावचा आस्वाद घेण्यात मग्न होता. त्यातला प्रतीक पारधी म्हणाला, औद्योगिकीकरण वाढायला हवे; मात्र त्यासाठी निसर्गाला धक्का लावला जातो हे काही बरोबर नाही. आंबेगाव तालुक्यातील दुर्गम भागात होत असलेल्या तथाकथित विकासामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याकडे प्रतीकने लक्ष वेधले. वनीकरण हा सरकारचा महत्त्वाचा कार्यक्रम व्हायला हवा, असे मतही त्याने व्यक्त केले. वृक्ष लावणाऱ्या संस्था, संघटनांना सरकारने प्रोत्साहनपर बक्षीस वगैरे सुरू केले तर एक चांगला प्रयोग होईल, असे त्याने सांगितले.
साबीर मुल्ला नावाच्या तरुणाने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मुद्दा मांडला. या भागातील कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद होत आहेत. त्यामुळे तिथल्या वस्ती-पाड्यांवरील मुलांचे नुकसान होत आहे. त्यावर मार्ग काढला जावा. त्याचबरोबर शाश्वत शेती वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. चांगले शिक्षण द्यायचे असेल तर आधी त्यासाठीच्या पायाभूत सुविधा तयार करायला हव्यात.