पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ८५ पेक्षा अधिक वयोमान असलेल्या ज्येष्ठांना घरबसल्या मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या घरबसल्या मतदान करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाने ८५ पेक्षा जास्त वयोमान असलेल्यांना तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तींना घरबसल्या मतदान करण्याची मुभा दिली आहे. त्यासाठी त्यांनी ‘१२ ड’ हा अर्ज भरून दिल्यास जिल्हा निवडणूक यंत्रणा संबंधित मतदारांच्या घरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांमध्ये अशा ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांपर्यंत केंद्रस्तरीय अधिकारी पोहाेचले असून त्यांना मतदानाच्या पर्यायाबाबत विचारणा करण्यात आली आहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील सध्या पुण्यात राहत असून त्यांचे वय नव्वदीच्या घरात आहे. या संदर्भात यांच्या कार्यालयाकडूनही जिल्हा निवडणूक शाखेकडे घरबसल्या मतदानाची सवलत मिळावी, याबाबतचा १२ ड अर्ज केला होता. जिल्हा निवडणूक शाखेने या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असून पाटील यांना घरबसल्या मतदान करण्याची संधी दिली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पाटील गेल्या एक महिन्यापासून उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य नव्हते. त्यामुळेच त्यांनी या पर्यायाचा लाभ घेतला आहे. प्रतिभाताई पाटील या २००७ ते २०१२ दरम्यान देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कार्यरत होत्या.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून १२ ड हा अर्ज भरून घेण्यात आला आहे. त्या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाली असून त्या घरबसल्या मतदान करू शकणार आहेत. जिल्ह्यातील सर्व चार लोकसभा मतदारसंघांतील अशा ८५ पेक्षा जास्त वयाेमान असलेल्या ज्येष्ठांना घरबसल्या मतदान करण्यासंदर्भातील प्रक्रिया २५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
- डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी