- खंडाेजी वाघे
पुणे : दिवसभर काम करून घरी जाण्यासाठी नांदेड सिटीच्या गेटजवळील बसस्टाॅपवर एकेकजण येत हाेता. साधारण अर्ध्या तासापासून बसच न आल्याने सर्वजण वैतागलेलेच! त्यातच ‘आमच्याच पक्षाला मत द्या असे आवाहन करणाऱ्या घाेषणा देत गेटच्या एका बाजूला रिक्षा थांबलेली, तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला रिक्षाच्या चहूबाजूने उमेदवार आणि पुरस्कृत पक्षांच्या फ्लेक्सनी वेढलेली दुसरी रिक्षा उभी होती. ‘साडेपाचपासून बसलाेय अजून गाडी नाही बघा’ साठीच्या घरात असलेले आजाेबा झाेडप्पा ठाणेकर कुरकुरले.
‘कुठं जायचंय’ विचारल्यावर ‘स्वारगेटला गुलटेकडी परिसरात राहताेय’ असे त्यांनी सांगितले. ‘कसं काय तुमच्या भागात वातावरण,’ असं विचारताच आमच्या भागात तर जो रोजगार महागाई विषयांवर बोलेल त्याच्यामागे आम्ही उभे राहु. आमच्या चांगल्या-वाईट कार्याला ज्यांचा हातभार राहताे. आमचा हात त्यांचेच बटण दाबेल. इतक्यात बाजूलाच काही तरुण मंडळी बसलेली. बस आली बस आली म्हणत लगेच उठली.
बऱ्याच वेळानं बस आली, तीदेखील खचाखच भरलेली. बस हलली अन् पुन्हा चर्चा सुरू झाली. ३५ वर्षीय सुनील भुट्टेकर म्हणाले, ‘मी राहायला अप्पर इंदिराला आहे. तुम्ही म्हणता ते खरं हाय, प्रचार सुरू झाला, कधी न भेटणारे आता भेटायला येताहेत; पण कुणाला वेळ आहे. लेकराबाळाच्या ताेंडी चार घास मिळवण्याकरिता कुठं कुठं फिरावं लागतंय. त्यात आता किती महागाई वाढली. एखादी गाेष्ट घ्यायची किंवा विकायची म्हटलं तरी जीएसटी द्यावा लागताेय, पण याकडे कुणाचं लक्ष आहे?’ त्यांच्या शेजारीच बसलेला तरुण विकास कांबळे म्हणाला, ‘मी राहायला कसब्यात आहे. त्यामुळे माझं मत जनसामान्यामध्ये मिसळणाऱ्या नेत्याला असेल.
‘ओ साहेब, दारात थांबू नका, चला पुुढं, जागा भरपूर आहे, या पुढं, कंडक्टरने आवाज दिला आणि गर्दी हलली. वडगाव पुलाजवळ आणखी काही प्रवासी बसमध्ये चढले आणि सर्वजण पुढे ढकलले गेले. बसमध्ये मधल्या दाराजवळ एक ज्येष्ठ गृहस्थ थांबलेले. ते म्हणाले, ‘मी प्रकाश वरके. काेथरूडमध्ये राहताे. आमच्या भागात सत्ताधाऱ्यांचीच हवा आहे. मात्र त्यांच्यासाठी ही निवडणूक टफच जाणार आहे, असे मला वाटते. त्याचबराेबर रस्ते, पाणी यांसारख्या सुविधा उपलब्ध करण्यात तितके यश मिळाले नाही, असे मला वाटते.’
म्हणूनच त्यांचा फाेटाे आमच्या माेबाईलवर-
स्वारगेटहून धायरीकडे जाणाऱ्या अनिल माेकरे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ज्या उमेदवारांनी गेली पाच वर्षे आमची कामे केली आहेत. त्यांनी केलेल्या कामातून आमचा विश्वास वाढवला आहे.’ यामुळेच तर आमच्या डीपीला त्या नेत्यांचे फोटो आहेत. आमची भुमिका स्पष्टच आहे. त्यांच्याच शेजारी बसलेले अहमद नेहल म्हणाले, मी जुन्नरचा आहे आणि मागील काळात झालेली कामे पाहुनच आम्ही मतं देणार आहोत.
असा हवा आम्हाला खासदार!
ताेच एक गृृहस्थ मारुती कांबळे म्हणाले, खासदार आम्हाला असा हवा, जाे जनसामान्यांच्या गरजा लक्षात घेणारा असेल. मात्र असा काेणताही उमेदवार नाही. आम्ही यंव करू, त्यंव करू असं म्हणणारे नकोत. पण किमान आम्ही जगू शकू, राशन पाण्यासाठी तरी माेताद व्हायला नकाे, आमच्या पाेरांना व्यवस्थित शिक्षण मिळावं, एवढं तरी केलं पाहिजे की नाही?
आमचे जिव्हाळ्याचे प्रश्न साेडवणाऱ्यालाच मत-
अमुक पक्ष आला तर संविधानात बदल हाेईल, असे कुणी सांगत आहेत, तर कुणी निवडणुकीनंतर अमुक समाजघटकाला सगळ्या संपत्तीचे वाटप हाेईल असे सांगत आहेत; पण आम्हाला राेज भेडसावणारे पाण्याचे, राहण्याचे विषशेत: जीर्ण वाड्याचे प्रश्न हाताळणाऱ्याला, राेजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्यालाच आमचे मत राहील, असे रमेश समेळ म्हणाले.
आज भांडतील उद्या एक होतील-
राजकारणाबाबत आम्हाला तर काहीच बाेलायचं नाही. कशाला बाेलायचं? आज भांडून घेतील उद्या एक हाेतील आम्ही बाेलून कशाला त्रास करून घ्यायचा. सगळेच गॅरंटी देताहेत, मागेसुद्धा अनेक गॅरंट्या दिल्यात; पण काय मिळालं आम्हाला. ना हाताला काम आहे, ना घरात समाधान ! राेज नवा खर्च; सध्याच्या कंडिशनमध्ये जीवन जगणं अवघड हाेऊन बसलंय आणि राजकारणावर बाेला म्हणायला तुम्हाला काय जातंय, एक मध्यमवयीन महिलेने आपला संताप व्यक्त केला.
सरकार कसं गाेरगरिबांची जाण ठेवणारं असावं. मात्र, गेल्या वर्षांतील सरकारच्या धाेरणांमुळे जगणं खूप अवघड हाेत चाललंय. आज आमचा घरातला गॅस हा हजारच्या घरात गेलाय अन् त्या तुलनेत निळा गॅस व्यावसायिकांसाठी स्वस्त आहे. आज पेट्राेल, डिझेलचे दर किती माेठ्या प्रमाणात वाढलेत. त्या तुलनेत सर्वसामान्यांचं इनकम थाेडंच वाढलंय? ते वाढण्यासाठी सरकारकडून काही मदत झाली पाहिजे. मात्र, गेल्या पाच वर्षांत असं काहीच झालं नाही. बदल तर हवाच! सामान्यांचं दुखणं समजून घेणारं कुणीतरी सरकारमध्ये यायला हवं.
- सविता नवले, धायरी फाटा
मी राहायला नऱ्हे-धायरी परिसरात आहे. आमच्या या पुलापासून बारामती मतदारसंघ सुरू हाेताे, तर पुलाच्या पलीकडे पुणे मतदारसंघ. मतदारसंघ काेणताही असाे मात्र कुठल्याही राजकीय पक्षाला कशाचंही काही पडलेलं नाही. सामान्यांच्या अडचणी त्यांना साेडवायच्या नाहीत. आता हा सिंहगड रस्ता आहे. या रस्त्यावर प्रचंड वर्दळ आहे. इथली काेंडी साेडविण्यासाठी रस्ता रुंदीकरण गरजेचा आहे. मात्र, येथे पुलाचा घाट घातला आहे आणि त्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरूच आहे. आता परत चर्चा मेट्राे पुलाची आहे. मग पुन्हा हा रस्ता असाच जाम राहणार का? सत्ताधारी असाे की विराेधक फक्त पैसा हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे.
- सुहास साळुंखे, नाेकरदार
राजकीय नेत्यांना सामान्यांचे काही पडलेच नाही. त्यांच्या लेखी पैसा-खुर्ची- पैसा हेच वर्तुळ महत्त्वाचे आहे. त्यामुळे आज ज्या प्रचार सभा, संविधान बदलाच्या वल्गना, एकाच समाजघटकाला संपत्तीचे वाटप करण्याचा आराेप, माेठ्या नेत्यांची भाषणे, आश्वासने, जाहीरनामे येत आहेत, त्याचा केंद्रबिंदू हा सामान्य नागरिक नाहीच, तर हे वर्तुळ आणि त्यासाठी करावे लागणारे व्यवहार आहेत. पक्षातील जी फाटाफूट झाली आहे, ती केवळ याच वर्तुळासाठी झालेली आहे.
- चंद्रकांत महाले, नागरिक
मी धनकवडीत राहताे. माझा छाेटासा व्यवसाय आहे. व्यावसायिक म्हणून राजकारणाकडे जेव्हा मी पाहताे, तेव्हा काेणतेही पक्ष महिला उमेदवारांना प्राधान्य देताना दिसत नाहीत. आज पक्षांचे जे जाहीरनामे, वचननामे येत आहेत, त्यामध्ये महिलांच्या दृष्टिकाेनातून हिताची असलेली काेणतेही मुद्दे पुढे येताना दिसत नाहीत. महिलांच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून धाेरण घेणाऱ्या पक्षाला आमचे मत असेल.
- प्रशांत शुक्ल, व्यावसायिक