नारायणगाव/ओतूर (पुणे) : 'मी अस्वस्थ आत्मा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणतात. होय, सर्वसामान्यांचे दुःख बघितले की, मी अस्वस्थ होतो. काहीही किंमत द्यावी लागली, तरी मी स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. देशाच्या राजकारणासाठी लाचार बनणार नाही,' अशा शब्दांत खा. शरद पवार यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ओतूर येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
'तुम्ही तोडफोडीचे राजकारण केले, घर फोडले, सहकारी फोडले, हे लाजिरवाणे आहे. सत्तेचा गैरवापर होत आहे, म्हणून या सरकारला हद्दपार केले पाहिजे,' असेही पवार यावेळी म्हणाले.
'माझे बोट धरून आले म्हणता आणि आता...'
पवार म्हणाले, 'माझ्या बोटाला धरून राजकारणात आले म्हणता आणि आता माझ्याबद्दल काय बोलता? पंतप्रधान पदावरील व्यक्तीने देशाच्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे.
ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे. ती २ सत्ता लोकांसाठी वापरायची असते. सध्या तक्रार आली की थेट कारवाई करून जेलमध्ये टाकले जाते. हा सत्तेचा गैरवापर आहे, असेही पवार म्हणाले. यावेळी शिरूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे उपस्थित होते. वेल्ह्यातही शरद पवार यांची सभा झाली. त्यांनी वेल्ह्यात २५ वर्षानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी हजेरी लावली.