पुणे : पीएच.डी.पर्यंतचे उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळेना झाली... महाविद्यालय, शाळांमध्ये पाच-सहा हजार रुपयांमध्ये राबवून घेतले जात आहे... लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असताना प्रत्यक्षात जागा मात्र शंभर ते दीडशेच निघत आहेत. त्यामुळे उच्चशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नांकडे राजकीय पक्षांचे लक्ष वेधण्यासाठी सेट-नेट पात्रताधारक, पीएचडी, डीटीएड-बीएड पात्रताधारक, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे पदवीधर यांनी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत पात्रताधारक संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीचे शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, त्यापैकी १६ मतदारसंघांतील उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक १२ ते २५ हजार रुपयांपर्यंतचे डिपॉझिट भरण्याचा खर्च वर्णगी गोळा करून उभा केला जाणार आहे. विद्यापीठात शुक्रवारी होत असलेल्या बैठकीमध्ये याबाबतची पुढील रणनीती निश्चित केली जाणार आहे.सेट-नेट पात्रताधारक समितीचे समन्वयक सुरेश देवडे यांनी सांगितले, उच्चशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न तीव्र झाले असतानाही कुठल्याच राजकीय पक्षाकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. उच्चशिक्षितांची शासनाकडून सातत्याने फसवणूक होत आहे.यापार्श्वभूमीवर शासनापुढे आपल्या मागण्या तीव्रपणे मांडण्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घ्यावा, असे काही जणांना वाटत होते. मात्र बहिष्कार टाकून फार काही साध्य होणार नाही, त्यामुळे निवडणूक लढवून आपले उपद्रव्यमूल्य सिद्ध करावे असा निर्णय घेण्यात आला. या निवडणुकीतील प्रचाराच्या निमित्ताने जास्तीत जास्त बेरोजगारांपर्यंत पोहचता येईल.तसेच त्यांच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा घडवून आणता येईल असे वाटल्याने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातील सेट-नेट पात्रताधारक, पीएचडी, डीटीएड-बीएड पात्रताधारक, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे पदवीधर यांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक यांचे मतदान जरी झाले तरी पात्रताधारक उमेदवार आपले उपद्रव मूल्य निश्चित दाखवून देऊ शकतील असा विश्वास त्यांना वाटतो आहे. त्यामुळे अत्यंत गंभीरपणे लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे.>...तर विधानसभेला आमचीनक्की दखल घेतीलबेरोजगारांच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा घडून यावी यासाठी आम्ही लोकसभा निवडणूक लढविणार आहोत. उच्चशिक्षित बेरोजगारांची संख्या खूप मोठी आहे, त्यांनी एकत्र आल्यास लोकसभा निवडणुकीत आम्ही आमचे उपद्रवमूल्य निश्चित दाखवून देऊ. त्यामुळे बेरोजगारांच्या प्रश्नांची सत्तेवर येणाऱ्या सरकारला नक्कीच दखल घ्यावी लागेल असे सेट-नेट पात्रताधारक समितीचे समन्वयक प्रा. सुरेश देवडे यांनी सांगितले.>केवळ सोशल मीडियामार्फतकरणार प्रचारलोकसभा निवडणूक लढवायची म्हटली तर त्यासाठी खर्च कुठून उभा करणार असा प्रश्न उच्चशिक्षित बेरोजगार उमेदवारांसमोर होता. लोकसभा निवडणुकीच्या डिपॉझिटची १२ ते २५ हजार रूपयांपर्यंतची रक्कम वर्गणीतून उभी करायची. त्यानंतरचा सगळा प्रचार फेसबुक, व्हॅॅट्सअॅप, मेसेज आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून करायचा अशी रणनीती या उमेदवारांकडून आखली जात आहे.
विद्यार्थी लढवणार लोकसभा निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2019 1:31 AM