शेलपिंपळगाव (पुणे) : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. कुठल्याही क्षणी निवडणूक जाहीर होईल अशावेळी युती, आघाडी यांच्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार आहेत. मात्र, त्यांच्या विरोधात महायुती कुणाला उमेदवारी देणार, हे अद्याप निश्चित नाही. पण, शिरूर लोकसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस देणार असेल तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्यास तयार आहेत. दरम्यान, आढळराव पाटलांना राष्ट्रवादीत सामावून घेण्यास खेडचे आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी उघडपणे विरोध दर्शवला आहे.
आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, आयुष्यभर आम्ही त्यांना विरोध केलेला आहे. राजकारण करण्यापेक्षा घरी बसू. राजकारण तत्त्वाकरिता व्हायला हवं. आयाराम गयाराम असे राजकारण झाले तर त्याला काही अर्थ उरणार नाही. तसे राजकारण मला करायचे नाही. पक्ष त्यांचे स्वागत करेल. तो पक्षाचा निर्णय असेल पण वैयक्तिक जीवनात काय करायचे हा अधिकार मला आहे. ज्यांनी मला जेलमध्ये बसवण्यापासून, आयुष्यातून उठवण्यापर्यंत भूमिका घेतली असेल त्यांच्यासोबत काम करायचे की नाही हा माझा निर्णय असेल. पक्ष स्वागत करेल. मात्र, माझा त्यांना विरोधच असेल. माझा निर्णय ठाम आहे. माझे वैयक्तिक मत असे की, मी गेल्या २० वर्षांपासून त्यांच्याशी संघर्ष करतोय. त्यांनी अतिशय खालच्या पातळीचं राजकारण माझ्यासोबत केले आहे.