शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 09:50 PM2024-05-10T21:50:54+5:302024-05-10T21:51:36+5:30
'काँग्रेसला मतदान करण्यासाठी फतवे काढले जाताहेत. आज मी फतवा काढतो की, सर्व हिंदूंनी महायुतीच्या उमेदवारांनी भरघोस मतांनी विजयी करावे.'
Lok Sabha Election Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, भाजपच्या उमेदवारांसाठी स्वतः राज ठाकरे (Raj Thackeray) मैदानात उतरले आहेत. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकवलीत सभा घेतल्यानंतर त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol) यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत हजेरी लावली. यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. तसेच राज्यातील जातीपातीच्या राजकारणावरुन जोरदार टीका केली.
विशेष म्हणजे राज ठाकरेंनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणावरुन शरद पवारांवर निशाणा साधला अन् अजित पवारांचे (Ajit Pawar) कौतुक केले. 'शरद पवारांनी 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना केली आणि राज्यात जातीपातीतेचे राजकारण सुरू झाले. राम गणेश गडकरींच्या पुतळ्यावरून राजकारण झाले, भांडारकर आणि जेम्स लेनच्या मुद्द्यावरून राजकारण झाले. परंतु अजित पवारांनी शरद पवार यांच्याबरोबर राहूनदेखील कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही', असं राज ठाकरे म्हणाले.
नियोजन नाही झालं तर पुण्यासारखी शहर उध्वस्त होतील; राज ठाकरेंचा इशारा
यावेळी राज ठाकरेंनी भाजपला मतदान करण्याचे आवाहनदेखील केले. ते म्हणाले, 'आज काँग्रेसला मतदान करण्यासाठी फतवे काढले जाताहेत. परंतु आज मी फतवा काढतो की, सर्व हिंदूंनी महायुतीच्या उमेदवारांनी भरघोस मतांनी विजयी करावे. आज राम मंदिर उभे राहिले असेल, तर ते फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळे. कारसेवकांनी जे काम केले, त्याचे फळ आज बघायला मिळत आहे. पुण्यामध्ये अनेक विकासाची कामे अडली आहेत. मुरलीधर मोहोळ यांना पुणेकरांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनदेखील राज ठाकरे यांनी केले.