मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 09:18 PM2024-05-09T21:18:03+5:302024-05-09T21:19:48+5:30

मतदानानंतर आता अजित पवार यांनी सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.

lok sabha election who will lead in Baramati Ajit Pawar reaction on Sunetra Pawar | मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...

मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...

Baramati Lok Sabha ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.  अजित पवार यांनी यापूर्वीच लाखांच्या फरकाने आम्ही विजय मिळवू, असा दावा केला होता. मात्र मतदानानंतर आता त्यांनी सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.

बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना किती मताधिक्य मिळेल, असा प्रश्न पत्रकारांकडून अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, "मताधिक्य सांगायला मी काही ज्योतिषी नाही. मात्र आमच्या उमेदवाराचा विजय होईल, ही खात्री आहे," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

बारामतीत मतदानाचा टक्का घसरला!

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून आल्यानंतर तिसऱ्या टप्पातही असेच चित्र दिसले. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची रात्री १०.४० पर्यंतची आकडेवारी पाहता पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या तुलनेत तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी ११ राज्यांतील ९३ जागांसाठी ६३.५३ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात सर्वाधिक लक्षवेधी लढत असलेल्या बारामती मतदारसंघात राज्यात सर्वात कमी मतदान झाले. २०१९ मध्ये येथे ६१.८२ टक्के मतदान झाले हाेते. यंदा ५४.१८ टक्के मतदानाची नाेंद झाली.  

उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता निवडणूक आयोगानेही मतदारांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, अनेक ठिकाणी सकाळी मतदानासाठी गर्दी झाली होती. दुपारी प्रमाण कमी झाले, सायंकाळी पुन्हा अनेक केंद्रांवर रांगा होत्या. अनेक प्रमुख नेत्यांनी सकाळच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबाद येथे, ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांनी बारामतीत मतदान केले. 

Web Title: lok sabha election who will lead in Baramati Ajit Pawar reaction on Sunetra Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.