मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री उशिरापर्यंत भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरु होती. या बैठकीत अनेक उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र यातील महत्त्वाचं म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातून रासपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
आमदार राहुल कुल रासपचे आमदार असले तरी मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कुल यांची जवळीक वाढली होती त्यामुळे कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा आहे. मात्र या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये मागच्या निवडणुकीत भाजपाला साथ देणाऱ्या महादेव जानकर यांना डच्चू देत मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहे. एकीकडे रासप आमदारांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर केली तर दुसरीकडे महादेव जानकर यांना बारामतीतून तिकीट नाकारले.
बारामती लोकसभा निवडणुकीसाठी रासपचे नेते महादेव जानकर आग्रही होते. मात्र या जागेवर लढायचं असेल तर भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी असं भाजपाकडून महादेव जानकरांना सांगण्यात आले. मात्र आपला स्वतंत्र्य पक्ष असून रासपच्या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचं महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून महादेव जानकर यांचे पंख छाटल्याचे बोललं जातंय.
महादेव जानकर यांनी मागील 2014 च्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून लढले होते. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ८० हजार मतांच्या आघाडीने विजय प्राप्त केला होता. महादेव जानकर यांच्या उमेदवारीने बारामतीत मागील निवडणुकीत काटे की टक्कर पाहायला मिळाली होती. इतकंच नव्हे तर सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य घटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची किंबहुना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची चिंता वाढली होती. त्यावेळी महादेव जानकर यांनी रासपच्या कपबशी चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र हीच निवडणूक महादेव जानकर यांनी कमळ चिन्हावर लढवली असती तर बारामती लोकसभेचे चित्र वेगळे असते असं भाजपाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होतं. त्यामुळे यंदा भाजपाकडून महादेव जानकरांना वगळून कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर केली.
लोकसभा निवडणुकीत रासपाने भाजपकडे दोन जागांची मागणी केली होती मात्र जानकरांच्या मागणीकडे भाजपाने दुर्लक्ष केल्याने महादेव जानकर नाराज आहे. आज रासपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक होत असून यामध्ये महादेव जानकर काय भूमिका घेतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.