पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाने रणजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र मोहिते-पाटील घराण्यातील व्यक्तीने राष्ट्रवादीला रामराम केल्याने पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला भगदाड पडले. माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांनाच उमेदवारी देण्याचं निश्चित झालं होतं मात्र ऐनवेळी त्यांनी फोन बंद ठेवला अन् निर्णय घेतला असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी सभा घेतली, यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, जयंत पाटील आणि पवार साहेबांचे पीए विजयसिंह मोहिते पाटील यांना सातत्याने फोन करत होते. मात्र, मोहिते पाटील यांनी दोन दिवस फोनच बंद करून ठेवला होता. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तरीही, विजयसिंह यांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. पवारसाहेबांनी हे स्पष्टपणे त्यांना सांगितलं होते. मी या घटनेचा साक्षीदार आहे, असे म्हणत अजित पवार यांनी माढ्यातील लोकसभेच्या जागेबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
तसेच पवार साहेबांनी आणि राष्ट्रवादीने माढ्यातून विजयसिंह यांना तुम्ही लढा असं सांगितलं होतं. पण त्यांनी दुसरंच नाव दिलं. त्या नावाला माळशिरस वगळता माण-खटाव, फलटण सगळीकडून विरोध होता. नंतर त्यांनी फोनच बंद करून ठेवला होता. आता आम्ही माढ्यामध्ये नवीन तरुण उमेदवार देणार आहोत असं अजित पवारांनी सांगितले.
विजयसिंह मोहिते पाटील ज्येष्ठ आहेत. त्यांच्यासारख्या नेत्यांची लोकसभेत आवश्यकता आहे. शरद पवारांनी स्वत: सांगितले माझी राज्यसभेची टर्म शिल्लक आहे, त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून रष्ट्रवादी काँग्रेस विजयसिंह मोहिते पाटील यांनाच तिकीट देणार होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी त्यांना सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असं अजित पवारांनी सांगितले. सध्या तरी राष्ट्रवादीकडून संजय शिंदे आणि प्रभाकर देशमुख यांचं नाव चर्चेत आहे.