Lok Sabha Election 2024, Vasant More Pune किरण शिंदे, पुणे: वसंत मोरे हे पूर्वाश्रमीचे मनसैनिक, मनसेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. मात्र आता बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे ते सैनिक झालेत. वसंत मोरेंनी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीत अधिकृतपणे प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करण्यापूर्वी वसंत मोरेंनी जवळपास सर्वच पक्षाचे उंबरे झिजवले आणि शेवटी मनसेतून उडालेलं त्यांचं विमान वंचित बहुजन आघाडीमध्ये लँड झालं. मात्र हे करतानाही वसंत मोरेंनी आधी लोकसभेचे तिकीट मिळवलं आणि त्यानंतर तीन दिवसांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
वसंत मोरेंना कोणत्याही परिस्थितीत लोकसभेच्या मैदानात उतरायचं होतं. मनसेतून आपल्याला तिकीट मिळणार नाही हे लक्षात येताच त्यांनी पक्षाला रामराम केला. इतके दिवस राज ठाकरे म्हणजे आपले दैवत आहेत असं सांगत फिरणाऱ्या वसंत मोरेंनी एका झटक्यात राज ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर सुरुवातीला त्यांनी महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेचे तिकीट मिळते का याची चाचपणी केली. शरद पवार, मोहन जोशी, संजय राऊत यांसारख्या महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट घेतली. मात्र तिथं काही त्यांचं जमलं नाही. मराठा आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या मनोज जरांगे पाटील यांचीही त्यांनी भेट घेतली. मात्र तिथेही गाडी पुढे गेली नाही. त्यानंतर मात्र वसंत मोरे यांनी थेट प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आणि पहिल्याच भेटीत त्यांचं तिकीट पक्कंही झालं. २ एप्रिलला त्यांच्या तिकिटाची घोषणाही झाली. मग त्यानंतर ३ दिवसांनी वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी प्रवेश केला.
दरम्यान, वसंत मोरे यांच्या उमेदवारीने पुण्याच्या निवडणुकीत रंगत येणार हे नक्की. सुरुवातीला पुण्याची निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अर्थात मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर यांच्यात होणार असं वाटलं होतं. वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीने ही निवडणूक अधिक रंगतदार होणार यात काही शंका नाही. वसंत मोरेंचा हा पॅटर्न पुणे लोकसभा निवडणुकीत चालेल का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.