पुणे : सोशल मीडियावरून राजकीय प्रचारासाठी करण्यात आलेल्या जाहिरातींचे प्रमाणीकरण न केल्याप्रकरणी ८ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यात पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांच्या पेजसह अन्य एका पेजला पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. अन्य तीन मतदारसंघांमध्येही पाच जणांना अशाच स्वरूपाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रमाणीकरण न केल्यास या पेजवर बंदी येऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स अर्थात पूर्वीचे ट्विटर यासारख्या सोशल मीडिया व्यासपीठांचा वापर करून राजकीय पक्ष तसेच उमेदवार प्रचार करत असल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात जिल्हा निवडणूक यंत्रणेने अशा प्रमाणीकरण न केलेल्या पोस्टला शोधून त्यावर कारवाई करण्याचे सुरू केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमधील आठ जणांविरुद्ध नोटिसा काढण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हा प्रमाणीकरण समितीने आपला अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सोपविला आहे. त्यानुसार या संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर काहींना येत्या एक-दोन दिवसांत नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून टेलिकास्ट, ब्रॉडकास्ट करण्यापूर्वी केबल नेटवर्क, केबल वाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक, खासगी एफएम चॅनेल, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्यात येणाऱ्या दृक-श्राव्य जाहिराती तसेच सोशल मीडिया इंटरनेट संकेतस्थळ, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या व्याख्येत बसणाऱ्या जाहिराती बल्क एसएमएस रेकॉर्ड केलेले व्हॉइस मेसेज यांचा प्रमाणीकरणाच्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे. या जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडे अर्ज करून प्रमाणित करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सोशल मीडियावरून प्रसारित करण्यात आलेल्या जाहिराती नेमक्या पेड आहेत किंवा नाही यासंदर्भातील माहिती या समितीकडे संबंधित प्लॅटफॉर्मवरून देण्यात येते. त्यानंतर ही कारवाई करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार पुण्यातील ३, शिरूरमध्ये १, मावळातील ३ व बारामती मतदारसंघातील २ अशा पेजवर कारवाई करण्यात येत आहे, यातील काही जणांनी आपली जाहिरात काढल्याचेही सूत्रांनी सांगितले. मात्र, अशा स्वरूपाच्या जाहिराती करण्यासाठी प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.