Ajit Pawar ( Marathi News ) : बारामती- देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत, या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघात अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी निवडणूक होणार असल्याचे बोलले जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी बारामतीकरांना भावनिक साद दिली.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना घराबाहेर पडण्याचे आदेश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली."आम्ही काम करतो, आम्ही फक्त वर वर राजकारण करत नाही आपण फक्त सेल्फी काढत फिरत नाही, असा टोला अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.मी लोकांची काम करुन दाखवतो. आता काही अडचणींमुळे कामे रेंगाळली आहेत, आता आपले विरोधक बाईटमध्ये माझ्याविरोधात बोलतात. मी काम करुन घ्यायला कॉन्ट्रक्टरसोबत जात असतो बाकीचे लोक घरी बोलावून जात काम देतात, असंही पवार म्हणाले.
"मी रोज सकाळी लवकर कामाची सुरुवात करतो, लोकांना काम आवडलं पाहिजे एवढाच या मागचा उद्देश असतो. तुमच्या मनात कोणताही संभ्रम राहता कामा नये. तुम्हाला वाटेल हे लोक परत एक होतील हे आपल्यालाच बनवतील असं तुम्हाला वाटेल पण असं काही नाही, आता सगळं क्लिअर आहे. आम्ही सांगून पण ऐकलं जात नाही, असंही अजित पवार म्हणाले. "बारामतीकरांनो आणखी एक सांगतो, आता आमच्या घरातील वरिष्ठ ते एकमेव आहेत, दुसरे आहेत पण ते पुण्यात असतात. त्यामुळे मी आणि माझा परिवार सोडला तर बाकीचे घरचे माझ्याविरोधात प्रचार करतील. माझ्या घरातील विरोधात गेले तरीही बारामतीमधील तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात, अशी भावनिक सादही अजित पवार यांनी दिली.
"अवघ्या काही दिवसातच लोकसभेची निवडणूक जाहीर होईल. मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचार संहिता लागू होईल. आम्ही २ मार्चला नमो रोजगार मेळाला बारामतीमध्ये ठेवला आहे. यात अनेक कंपन्या येणार आहेत. या मेळाव्यात इंदापूर, दौड, बारामती तालुक्याने मागे राहू नये. महाराष्ट्रात सहा ठिकाणी असे मेळावे घेणार आहेत. याला राज्य सरकारने पाच कोटी रुपयांचे अनुदानाची तरतुद केली आहे, असंही अजित पवार म्हणाले.