पुणे : गुलामगिरीच्या काळात स्वातंत्र्यासाठी लोकमान्यांनी देशाचे राजकीय नेतृत्व केले. जे-जे ब्रिटिश राजवटीच्या विरोधात होते, त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेतले. देशात असा एकही प्रांत नव्हता जिथे लोकमान्यांचे अनुयायी नव्हते. लोकमान्यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वगुणामुळे देशातील, समाजातील एक एक घटक त्यांच्या पाठीशी उभा राहत गेला. निष्काम कर्मयोगामुळे लोकमान्यांची कीर्ती देशभरात पोहोचली आणि आपोआपच लोकमान्य देशाचे नेते बनले. त्यांनीच आधुनिक भारताचे समर्थपणे नेतृत्व केले, असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
वक्तृत्वोत्तेजक सभा, पुणे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या १४६ व्या ज्ञानसत्राचे उद्घाटन डॉ. सदानंद मोरे यांच्या व्याख्यानाने झाले. ‘लोकमान्यांचा निष्काम नेतृत्वयोग' या विषयावर त्यांनी पहिले पुष्प गुंफले. प्रथमच कोरोना संकटामुळे हे ज्ञानसत्र ऑनलाइन होत आहे. वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक अध्यक्षस्थानी होते. या वेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक, वसंत व्याखानमालेचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, खजिनदार रामचंद्र जोशी, सचिव डॉ. मंदार बेडेकर आदी ऑनलाइन उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, लोकमान्य टिळकांचे नेतृत्व हे जात, धर्म, समूहापुरते मर्यादित नव्हते. सत्तेची लालसा मनात न बाळगता निष्काम कर्मयोगाचे उदिष्ट्ये घेऊन ते सर्वसामान्यांत मिसळत गेले. त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटविली. लोकमान्यांनी देश स्वातंत्र्याच्या चळवळीला बळ देण्यासाठी राष्ट्रीय शिक्षणाचा पाया घातला. सभा आणि दौऱ्यातून लोकजागृती केली. गणेशोत्सव, शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणले. दुष्काळात लोकमान्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले. म्हणून ते खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाचे पहिले नेते ठरले. डॉ. मंदार बेडेकर यांनी प्रास्ताविक केले.