पुणे : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि. ही कायमच सामाजिक उत्तरदायित्वाचे भान जपत कार्यरत असते. त्याचाच भाग म्हणून संस्थेने कोविड काळात अविरत कार्यरत असणाऱ्या संस्था आणि कार्यकर्ते या माणुसकीच्या दूतांचा सन्मान घेतला.
अन्नामृत फाऊंडेशन, आफळे अकादमी, अखिल मंडई मंडळ, गिरिजा कट्टा, दगडूशेठ गणपती ट्रस्ट, हेल्प रायडर्स ग्रुप, खंडोबा देवस्थान समिती, स्नेह मंच परिवार, जनकल्याण समिती आदी संस्था आणि कार्यकर्त्यांना डॉ. दिलीप देवधर यांच्या हस्ते सन्मानित केले गेले. पुणे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, समन्वयक भालचंद्र कुंटे आणि सहाय्यक क्षेत्रीय प्रबंधक हर्षद झोडगे यावेळी उपस्थित होते.
या सोहळय़ाच्या आयोजनाबद्दल संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी संस्थेचे अभिनंदन केले. “संकट काळी समाजाच्या सेवेसाठी निस्वार्थीपणे झोकून देणारे कार्यकर्ते हेच सामाजिक आदर्श असावेत. संधीसाधू आणि व्यापारी मनोवृत्तीमुळे जनसामान्यात गोंधळाची स्थिती वाढत असताना निरलस कार्यकर्त्यांचे व्यासपीठ कायमस्वरूपी असले पाहिजे,” असे डॉ. देवधर म्हणाले. “हा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात असून विविध शाखांच्या पातळीवरही अडीचशेपेक्षा अधिक कार्यकर्ते आणि संस्थांचा सन्मान करणार आहे,” असे सुशील जाधव म्हणाले.