पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रांमध्ये होत असलेल्या मद्य आणि तंबाखूच्या पुरवठ्याचा प्रकार 'लोकमत'ने उघडकीस आणल्यानंतर जाग्या झालेल्या प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त आयुक्त स्तरावर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.
बालेवाडी निकमार येथील कोविड सेंटरवर काम करणारे स्वच्छता कर्मचारीच दुचाकींचा डिकीमधून लपवून हा 'माल' जादा दराने पोहचवीत असल्याचे सुरक्षा रक्षकांनी केलेल्या तपासणीत उघडकीस आले होते. विलगीकरण केंद्रांवरील स्वच्छतेसाठी दिशा या एजन्सीला कंत्राटी पद्धतीने ठेका देण्यात आलेला आहे. विलगीकरण कक्षात स्वच्छता कर्मचारीच दारूच्या बाटल्या आणि तंबाखूच्या पुड्या, गुटखा, पानमसाला पोचवीत आहेत. यासंदर्भात 'लोकमत'मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
विलगीकरण व कोविड केअर सेंटर्सवरील स्वच्छतेचे काम अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल यांच्या अखत्यारीत येते. या केंद्रांवरील स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर झालेला आहे. त्यातच मद्य आणि व्यसनांचे साहित्य पोहचू लागल्याने या अतिवरीष्ठ अधिकाऱयांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. याविषयी बोलण्याकरिता अतिरिक्त आयुक्त गोयल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशीच्या सूचना दिल्याचे स्पष्ट केले.