बारामती (पुणे) : पालखी सोहळ्यादरम्यान विनापरवाना मोठ्या आवाजात डीजे लावणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचा इशारा बारामती शहर पोलिसांनी दिला आहे. रविवारी (दि. १८) संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बारामती येथे मुक्कामी असणार आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी मोठ्या आवाजात डीजे लावले जातात. त्यामुळे वारकऱ्यांबरोबर स्थानिक भाविकांना देखील याचा त्रास होतो. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये शुक्रवारी (दि. १६) प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलिसांनी विनापरवाना डीजे वापराविरोधात घेतलेल्या भूमिकेचे वारकरी भाविकांमधून स्वागत होत आहे.
बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणीही विनापरवाना डीजे पालखीच्या स्वागतासाठी लावणार नाहीत, लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. रथाच्या बैलजोड्या मोठ्या आवाजाने बुजू शकतात व वारकऱ्यांच्या नामस्मरणाला, टाळ-मृदंगाला त्यामुळे बाधा येत असल्याने याबाबत सक्त कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांचा महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ चा प्रतिबंधित आदेशसुद्धा या कालावधीमध्ये लागू आहे. पालखी आगमनानिमित्त बारामती नगरपालिकेतर्फे (दिनांक १८) जून रोजी तुकाराम महाराज पालखी व दिनांक २१ जून रोजी संत सोपान काका महाराज पालखी मुक्कामी असल्याने शहरातील सर्व प्रकारचे मटण, चिकन, फिश व सर्व कत्तलखाने बंद राहणार आहेत.
याबाबतचा आदेश बारामती नगरपालिकेने काढलेला आहे. पोलिस दलातर्फे सदरच्या आदेशान्वये कारवाई करण्यात येणार आहे. तसेच बारामती नगरपालिका हद्दीत सर्व शासकीय मान्यताप्राप्त देशी-विदेशी दारूची दुकाने दिनांक १८ जूनरोजी बंद राहतील. तसे आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केलेले आहेत. त्याचा भंग केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील महाडिक यांनी दिला आहे.