सांगवी : बारामतीत स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा करून काळा बाजार होत असल्याबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रसिद्ध करताच पुण्याच्या मुद्रांक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत बुधवारी (दि. ७) बारामतीच्या तहसील कार्यालयातील दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांना सूचना करत परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांना एकत्रित बोलावून नोटिसा बजावत सूचना केल्या होत्या. तसेच नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीची दखल घेत बारामतीमधील परवानाधारक यांचे रजिस्टर तपासून समज देण्यात आली. तालुक्यात एकूण २७ परवानाधारक आहेत. त्यापैकी बारामती शहरात जवळपास २२-२३ मुद्रांक परवानाधारक आहेत.
शासकीय कार्यालयांशी निगडीत प्रतिज्ञापत्र, संमतीपत्र, अॅफिडेव्हीट आदी शासकीय कामकाजासाठी आवश्यक कोर्ट फी, स्टॅम्प व स्टॅम्प पेपर मात्र मुद्रांक विक्रेत्यांकडे उपलब्ध होत नव्हते. त्याचा फायदा घेवून काही दलालांनी कोर्ट फी आणि स्टॅम्पची काळया बाजारात विक्री करून पैसे कमवण्याचा उद्योग जोरात चालवला होता. १०० रुपयांचा स्टॅम्प चढ्या भावाने १५० रुपयांना विक्री केली जात होती. याचा फटका गोरगरीब जनतेसोबतच,विद्यार्थी, सामान्य नागरिकांना बसत होता.
बारामती तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत बारामती शहरात ५ रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंतचे स्टॅम्प पेपरचा काळाबाजार व कृत्रिम तुटवडा निर्माण करून स्टॅम्प पेपरची चढ्या दराने विक्री केली जात असल्याचे समोर आले होते. यामुळे गोरगरीब जनतेची लूट करत काही परवानाधारक मुद्रांक विक्रेते स्वत:चे उखळ पांढरे करून घेत होते. पुणे दुय्यम निबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी टाळाटाळ करणाऱ्या मुद्रांक परवानाधारक यांना नोटिसा बजावून समज दिल्यानंतर आता मुद्रांक विक्रेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.