मार्गासनी : ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘वेल्ह्यातील विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन गणवेशाविना’ या वृत्तामुळे वेल्हे प्रशासन खडबडून जागे झाले. यामुळे वेल्ह्यातील सोळाही केद्रांतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती विस्तार अधिकारी सुनील मुगळे यांनी दिली.
वेल्हे तालुक्यात एकूण १४५ शाळा असून, सोळा केंद्रांमध्ये एकूण ३ हजार ७५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर दि. १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. सोळा केंद्रांपैकी रांजणे व पानशेत केंद्रातील शाळांमध्ये गणवेशाचे वाटप झाले होते. इतर केंद्रावरील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन विनागणवेश साजरा करावा लागला होता. तर गटशिक्षणाधिकारी संजय तांबे यांनी गणवेश वाटपाबाबतचा निधी एक महिन्यापूर्वीच शाळांच्या खात्यावर वर्ग केला होता, तर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप झाले नाही, असे लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत वेल्हे प्रशासनाने त्वरीत सर्वच केंद्रातील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले.