पुणे : पहाटेच्या थंडीतही प्रचंड उत्साहात हजारो पुणेकर लोकमत मॅरेथॉनमध्ये धावले. वयाचे बंधन न बाळगता हजारो पुणेकरांनी सहभागी होत जल्लोषात ही स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी उपस्थित होती.
या स्पर्धेचे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, लोकमत महामॅरेथॉनच्या प्रमुख रूचिरा दर्डा, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव, आमदार मेधा कुलकर्णी, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, महापालिका आयुक्त सौरव राव, पीएमआरडीए आयुक्त किरण गित्ते, महामार्ग अधिक्षक मिलिंद मोहिते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, आर एम धारिवाल फांऊडेशनच्या अध्यक्ष शोभा धारिवाल,अंनिसचे कार्याध्यक्ष मिलिंद देशमुख,अभिनेता आलोक राजवाडे, अभिनेत्री राधिका देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
रविवारची सकाळ पुणेकरांनी लोकमतसह साजरी केली. 'माझे पळणे, माझ्यासाठी' अशा घोषवाक्याखाली हजारो पुणेकर बालवाडी स्टेडियमपासून धावत होते. एकवीस किलोमीटर, दहा किलोमीटर, पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा गटात दहा हजारपेक्षा अधिक पुणेकर मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहे. सुरुवातीला झुंबा करून स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यात आले. संपूर्ण स्पर्धा मार्गात ठराविक अंतरावर लोकमत स्वयंसेवक मार्ग दाखवत होते.शिवाय वैद्यकीय पथक आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय उल्लेखनीय बाब म्हणजे सुमारे 150 दिव्यांगांनीही विशेष स्पर्धा पूर्ण केली. शिवाय अनेकांनी लहान मुलं आणि कुटुंबासह 3 किलोमीटरची 'फॅमिली रन' पूर्ण केली.