पुणे : आम्ही खाण्याचे पैसे घेतो, अन्न पानामध्ये टाकण्याचे नाही’,‘एक ते चार या वेळेत कोणीही प्रचारासाठी येऊ नये’, ‘चार वेळा कंट्रोल एस दाबले तरी सेव्ह एकदाच होते’, ‘आमची कोठेही शाखा नाही’, ‘आमच्या घरातील मुले क्रांतिकारक आहेत, त्यामुळे तुमच्या गाडीवर हल्ला झाल्यास आम्ही जबाबदार असणार नाही’,‘आमचं कुत्र ९९ जणांना चावलंय, तुम्ही बेसावध राहिलात तर त्याची सेंच्युरी पूर्ण होईल’ अशा पाट्या दृष्टीस पडू लागल्या की तुम्ही नक्की पुण्यातच आहात हे सुज्ञास सांगणे न लगे!
पुणेरी पाट्या म्हणजे आमच्या अभिमानाच आरसाच जणू! होय, पाट्यांमधून झळकतो पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती. पुण्याच्या या अभिमानाचे साक्षदार होण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने पृथ्वी एडिफाईस प्रस्तुत रुद्रा लेझर होमिओपॅथी क्लिनिक यांच्या सहयोगाने शनिवार आणि रविवारी ‘पुणेरी पाट्या प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. ‘खत्री बंधू पॉटआईस्क्रिम व मस्तानी’ सहप्रायोजक आहेत. पुणेकर पाट्यांमधून स्वत:च्या व्यंगावर बोट ठेवण्याचं धाडस दाखवतो, चपखल शब्दांमधून मार्मिक टिपण्णीही झळकते याच पाट्यांमधून..!
पुणेकर जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपली स्वत:ची ओळख निर्माण करतात. अभिमान आहे मला आणि तुम्हाला पुणेरी असल्याचा! हाच अभिमान आता झळाळून निघणार आहे एका अभिनव स्पर्धेतून! तुमच्या खास पुणेरी शैलीत, कानपिचक्या घेणारी, खुमासदार मार्मिक टिपण्णी (की टोमणा?) करणारी हटके पाटी लिहून आमच्याकडे puneripatya2018@gmail.com या पत्त्यावर पाठवाव्यात. खासमखास पुणेरी पाट्यांना 'आकर्षक बक्षीसासाह लोकमत’मधून यथायोग्य प्रसिध्दी दिली जाईल.
याला वयाचे बंधन नाही, शिक्षणाची अट नाही आणि जातपंथवर्णभेद तर मुळीच नाही. अगदी लहान वयाचा एखादा मुलगाही मार्मिक शब्दात भला मोठा आशय व्यक्त करतो व एखादे वयस्कर आजोबाही या रस्त्यावरचा सिग्नल विमानालाही उपयोगी पडतो असे म्हणू शकतात. पुणेरी काकू एखाद्याची अशी खिल्ली उडवतील की हास्याचे फवारे उडतील व आजीही नव्या पोरींची अशी फिरकी घेतील की त्या लाजून चूर होतील. चेष्टा करावी तर त्यातही काही टँलेट असावे ही दृष्टी पुणेरी पाट्यांनीच दिली. खडूस, खत्रूड, खवटच व तरीही हवेहवेसे वाटणारे या पाट्यांमधील शब्द अस्सल पुणेकराची तैलबुद्धी दाखवतात व त्याचा खास पुणेरी बाणाही!इथला रिक्षावालाही रिक्षाच्या मागे चिकटू नका, मार बसेल असे लिहून जातो. तर एखादा मालमोटार चालक तेरा मेरा साथ असे १३, मध्ये मेरा व नंतर ७ असे अंकात लिहून मजा आणतो. कुत्र्यापासून सावध रहा ऐवजी, सावधान, कुत्रा चावरा आहे असेही इथेच लिहितात. बेल एकदाच वाजवावी, जिना चढताना आवाज करू नये, दरवाजासमोर वाहने लावल्यास पंक्चर केली जातील अशा मजेशीर रचना म्हणजे मधूनच बरसणारी आनंदाची सरच असते. पुण्याशिवाय अन्यत्र कुठे हा अनुभव येणार नाही.