लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लोकमत आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी झालेल्या ‘रक्तदान महायज्ञात’ २५६ जणांनी रक्तदान केले.
राज्यात कोरोना आपत्तीत निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैपासून राज्यभर रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. या महायज्ञात अजित पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी झाली. ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हे शिबिर जिल्ह्यात सर्वाधिक रक्त संकलन करणारे ठरले.
‘सिम्बायोसिस’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन झाले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गणेश नलावडे यांच्यासह मिलिंद वालवडकर, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, महेश हांडे, दीपक पोकळे, प्रदीप देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.
सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या या शिबिरात महिला, तरुण रक्तदात्यांची संख्या मोठी होती. दिवसभर महिला-तरुणांचे थवेच्या थवे रक्तदान शिबिरात येत होते. मात्र कोरोना लसीकरण, हिमोग्लोबिनची कमतरता, कोरोना संसर्ग यामुळे इच्छा असूनही अनेकांना निराश होऊन परत जावे लागले. सायंकाळी जोरदार पाऊस आल्याने अनेकांनी रक्तदानाची वेळ वाढविण्याची विनंती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना केली. यामुळे सायंकाळी साडेआठपर्यंत रक्तदान महायज्ञ चालू राहिला. यात २५६ जणांनी रक्तदान केले.
चौकट
आचार्य आनंदऋषी पुणे ब्लड बँक व ओम ब्लड बँक यांनी रक्तसंकलनाचे काम पार पाडले. या दोघांनी अनुक्रमे १२६ आणि १३० युनिट्स रक्तसंकलन केले.
चौकट
“राज्याचे नेेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘लोकमत’ आयोजित रक्तदान महायज्ञात सहभागी होण्याचा निर्णय आम्ही घेतला. अजितदादांना अभिमान वाटेल अशा मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचा संकल्प आम्ही सोडला होता. त्यास सर्व कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी साथ दिली. त्यामुळे लोकमतच्या व्यासपीठावर जिल्ह्यातील सर्वात मोठे शिबिर घडू शकले याचा आनंद आहे.”
-प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
--------------------------
फोटो मेल केला आहे़