सखे, आज शनिवारवाड्यावर
तुला मशाल पेटवायचीय!
सखे,
किती कर्णबधिर असावी ही व्यवस्था! जिला ऐकू येत नाही, जी बोलू शकत नाही, अशा अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो. वर्षानुवर्षे! त्यात तिचा सख्खा भाऊही असतो. ही अशी व्यवस्था आहे, जी भीती दाखवते रस्त्याची. अंधाराची. जिथे घरात ‘ती’ सुरक्षित नाही, तिथे रस्त्याचे काय? नुकतीच जन्मलेली मुलगी जिथे जन्मदात्यांकडूनच मारून टाकली जाते, तिथे इतरांचे काय?
मुद्दा अंधाराचा नाही. या व्यवस्थेचा आहे. या घाणेरड्या नजरांचा आहे. विकृत मानसिकतेचा आहे. त्यामुळे अंधाराची भीती आता खूप झाली. हे घाबरणे तू बंद केले नाहीस, तर हे आणखी घाबरवत राहतील. मौन सोडून तू बोलली नाहीस, तर ते आणखी मस्तवाल होतील. म्हणून तुला आज बोलावे लागेल. रस्त्यावर उतरून या अंधाराशी दोन हात करावे लागतील!
सखे, तू आहेस एकविसाव्या शतकात. पण, यांची नजर अद्यापही मध्ययुगातच असेल, तर त्यांना सणसणीत चपराक द्यावी लागेल. महिलेला शरीरात बंदिस्त करून टाकले या व्यवस्थेने. शरीराशिवाय ज्यांना काही दिसत नाही, त्यांच्या नजरा बदलाव्या लागतील. त्यांच्या विकृत मानसिकतेमुळे तुझ्या स्वातंत्र्यावर गदा कशासाठी? तू कपडे कोणते घालावेस? तू किती वाजता घरी परत यावे? हा सगळा अधिकार तू यांना कशासाठी दिलास?
बालपणामंधी बापाचं नाव
तरुणपणामंधी पती हा देव
म्हातारपणामंधी पोरांना भ्यावं…!
हे सगळं जे काही आहे, ते आपल्याला बदलावं लागणार आहे. आपण स्वतंत्र व्यक्ती आहोत. ‘माणूस’ आहोत. आपल्या जगण्यावर आपला हक्क आहे, हे आजच नाहीस सांगितले, तर उद्या हाच अंधार तुला गिळून टाकणार आहे. म्हणून, तुला आज यायचंय सखे! उद्याच्या सख्या सन्मानाने आणि सुरक्षित जगाव्यात, अशी इच्छा असेल, तर आज तुला यावं लागेल.
तू स्वतःसाठी येणार आहेस. तुझी ताकद दाखवण्यासाठी येणार आहेस. मुख्य म्हणजे, तू छान धमाल करणार आहेस आज रात्री. मस्त गाणी, गोष्टी, पथनाट्यं अशी छान मौज असेल. तुझा आवाज ऐकूनच अंधार गायब होईल. तुझ्या मुक्त हसण्यामुळे चिरेबंदी वाड्यांना तडे जातील. उद्या गर्भात ‘ती’चा खून करताना, ते घाबरतील. एकतर्फी आकर्षणातून ‘ती’ला मारून टाकताना, त्यांचे हात थांबतील. हुंडा मागताना त्यांना आवाजच फुटणार नाही. अंधारात तिच्याकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही.
पण, त्यासाठी तू एवढंच करायचं!
रात्रीच्या अंधारावर मात करण्यासाठी आज घराबाहेर पडायचं. येशील ना?