पुणे : भक्ती, शक्ती, सन्मती, संस्कृती....ही सगळी ‘ती’चीच रुपे! ‘ती’चे कालातीत महत्व अधोरेखित व्हावे, या भावनेतून २०१४ साली लोकमतच्या पुणे आवृत्तीमध्ये ‘ती’चा गणपती या चळवळीचा श्रीगणेशा झाला. सहा वर्षांमध्ये ही चळवळ पुण्यात रुजली आणि बहरली. ‘लोकमत’च्या इतर सर्व आवृत्तींमध्ये या चळवळीचे रोपटे रुजले. यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असतानाही आर‘ती’चा तास, सामूहिक अथर्वशीर्ष पठण, नाद गणेश या उपक्रमांचा आॅनलाईन जागर झाला आणि पुणेकरांनी या चळवळीला उदंड प्रतिसाद दिला.महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण हा समाजाच्या विकासातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. सक्षमीकरणाच्या चळवळीची सुरुवात स्वत:पासून व्हायला हवी, हे ‘लोकमत’ने हेरले आणि त्यातूनच ‘ती’चा गणपती या संकल्पनेचा जन्म झाला. गणरायाच्या प्रतिष्ठापनेपासून, दररोजची आरती, विसर्जनापर्यंत सारा सोहळा ‘ती’च्याच हस्ते पार पडावा आणि या माध्यमातून स्त्रीला उचित सन्मान मिळावा, या भावनेतून ही चळवळ सुरु झाली. लोकमत ‘ती’च्या गणपतीच्या दर्शनासाठी येणाºया पुण्यातील सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.उत्सवकाळात ‘ती’चे अस्तित्व काही गोष्टींपुरतेच मर्यादित राहिले होते. ‘ती’ला पूजेचा मान कधीच देण्यात आला नाही. त्यामुळं ‘ती’ची अनेकदा घुसमट व्हायची. उत्सवावर असलेली पुरूषी मक्तेदारी मोडीत काढण्याचे धाडस आजवर कुणी दाखवले नव्हते. गणेशोत्सवाच्या केंद्रस्थानी ‘ती’ला आणण्यासाठी २०१४ मध्ये पहिल्यांदा ‘लोकमत’ने धाडसी पाऊल उचलले. देवाच्या पूजा-अर्चेचा संबंध हा ‘ती’च्या मासिक धर्माशी जोडल्याने सण-उत्सव काळात ‘ती’ला वेगळे बसविण्याची एक सोयच समाजाने करून ठेवली होती.एकीकडे समाजात स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे ‘ती’ला सोयीस्करपणे काही गोष्टींपासून दूर ठेवायचे. हेच थांबवण्यासाठी सुरु झाली ‘ती’च्या सन्मानाची अभिनव चळवळ. सार्वजनिक गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यनगरीत ‘ती’च्या गणपतीमधून ‘ती’ला सन्मान देण्याचे बीज रुजले. ‘ती चा गणपती’ हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिले महिला गणपती मंडळ आहे.या परंपरेला धरून यावर्षी प्रचिती, अभिव्यक्ती, उन्नती, आरती, शक्ती, भक्ती, प्रगती, प्रीती, जागृती, सन्मती, आणि खाद्य संस्कृती या रूपात ‘ती’चा सन्मान करण्यात आला. ‘ती चा गणपती’मधून स्त्री सक्षमीकरणाच्या चळवळीला बळकटी देत असताना स्त्री-पुरुष समानतेच्या धोरणाची पाळेमुळे समाजात खोलवर रुजण्याची गरज आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून आर‘ती’चा ही अनोखी संकल्पना देखील साकारली.पुरोगामी महाराष्ट्रात समानतेचे पाऊलपुरोगामी महाराष्ट्रात एक समानतेच्या दृष्टीने एक अभिनव पाऊल टाकले. स्त्री सक्षमीकरणाची, स्त्री-पुरुष समानतेची सुखद, सुमंगल चळवळ यानिमित्ताने जनमानसात रूजली. आजमितीला ही संकल्पना केवळ पुण्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचा मानबिंदू बनली आहे.
‘ती’ला सन्मान आणि अधिकार देणाऱ्या लोकमत ‘ती’च्या गणपतीची उज्ज्वल परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 7:21 AM