पुणे - स्त्रियांना आतापर्यतच्या प्रवासात खूप काही गमवावे लागले. तिचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. दरवेळी मान अपमान, दुःख, उणेपणाची भावना तिला कायम उराशी बाळगावी लागली. यासगळ्यात तिच्या मनाला पुरूषीपनाचा डंख बसत गेल्याने तिच्यातील सर्जनशिलतेला पुरेसा न्याय मिळाला नाही. यापुढेही सक्षम व ठामपणे उभे राहण्यासाठी तिला पुरुषीपणाचे आव्हान मोडून काढावे लागेल. असा सूर लोकमत विमेन समिट २०१८ च्या परिसंवादात व्यक्त करण्यात आला.
या परिसंवादात मादागास्करचे भारतातील राजदूत मरी लिओनतिनी रझांद्रोसा, पद्मश्री सुधा वर्गीस, यूएसके फाउंडेशनच्या उषा काकडे, राष्ट्रीय महिला आयोयाच्या रेखा शर्मा, मुकुल माधव फाउंडेशनच्या रितू छाब्रिया, रुपाली देशमुख उपस्थित होत्या. आफ्रिकेत देखील सर्व काही आलबेल आहे असे नाही. खासकरून मादागास्कर मध्ये देखील स्त्री पुरुष भेद पाहवयास मिळतो. माहिती आणि तंत्रज्ञानच्या युगात स्त्री ला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशी खंत मरी लिओनातीनी रंझद्रोझा यांनी व्यक्त केली. वर्गीस म्हणाल्या, सुरुवातीपासून लहान मुलांच्या शिक्षण या घटकावर लक्ष केंद्रित केले. बिहार मधील एका गावात दारुच्या पूर्णपणे आहारी गेलेल्या लोकांना आपल्या मुलांच्या भवितव्याची काळजी नव्हती. स्वीडन आणि स्टोकहोम मध्ये देखील पाण्याचा प्रश्न बिकट असल्याचे देशमुख यांनी सांगितले. पाणी वाचविण्यासाठी पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त पुढाकार घेत असल्याची मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी केली. तर छाब्रिया यांनी समाजात स्त्री पुरुष समानता आणायची असल्यास त्याची सुरुवात शिक्षणापासून हवी असे सांगितले. अद्याप आपल्याकडे स्त्री पुरुष भेद, स्त्रीयांकडे सामाजिक दृष्टीने पाहण्याची भावना हे बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.