पुणे : महिलाशक्तीच्या आविष्काराची ओळख बनलेल्या ‘लोकमत वुमेन समीट’चे आठवे पर्व मंगळवारी होणार आहे. नेतृत्वाकडे झेप #Live to Lead ही या वुमेन समीटची यंदाची संकल्पना आहे. एनईसीसी व लेक्सिकन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महाराष्ट्र महिला आयोग आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होणार आहे. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील. परिषदेला प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू, राजश्री देशपांडे, सौंदर्या शर्मा, जल आणि शाश्वत विकासच्या तज्ज्ञ रूपाली देशमुख, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव विनीता सिंघल, लेक्सिकन स्कूल्सच्या संचालिका डॉ. मोनिषा शर्मा, सिम्बायोसिसच्या संचालक स्वाती मुजुमदार, तृतीयपंथीयांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, ऐश्वर्या तमाईचीकर, उद्योजिका सुजाता चॅटर्जी, श्रद्धा शर्मा, प्रसिद्ध वेडिंग डेकोर डिझायनर गुरलीन पुरी उपस्थित राहणार आहेत. महिलांनी आज समाजाच्या सर्व क्षेत्रांत नेतृत्वाच्या दिशेने झेप घेतली आहे. मात्र, हा प्रवास सोपा नव्हता. महिलांच्या शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्यासावित्रीबाईंच्या दिशेने दगड फेकले गेले. त्यावरही महिलांनी मात केली. शिक्षणाचे अग्निपंख मिळाल्याने देशातील पहिल्या डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशी यांनी मान मिळविला. संस्कृतमध्ये वादविवाद करून शास्त्रार्थात सनातन्यांचा पराभव करणाऱ्या रमाबाई रानडे यांचे कर्तृत्व अढळ ताऱ्यासारखे चमकू लागले. लक्ष्मीबाई टिळक यांनी महिलांची व्यक्त होण्याची वाट प्रशस्त केली. महिलांच्या इतिहासातील या चारही टप्प्यांनी महिलांना नेतृत्वाकडे झेप (लिव्ह टू लीड) घेणे शक्य झाले. विविध परिसंवादांतून हा प्रवास उलगडणार आहे. डीपीईएस व हॉटेल माधव इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी आणि धीरेंद्र आऊटडोअर मीडिया प्रा. लि. आऊडोअर पार्टनर आहेत. .............
* दगडांचा मारासावित्रीबाई फुले यांना समर्पित या चर्चासत्रात परिवर्तनाच्या वाटेवर चालणाऱ्या महिलांना समाजाकडून कसा विरोध होतो यावर चर्चा होणार आहे. तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या गौरी सावंत, महिलांना मंदिर प्रवेशासाठी आंदोलन उभारणाऱ्या तृप्ती देसाई आणि कंजारभाट समाजातील कौमार्य परीक्षेविरुद्ध एल्गार पुकारणाऱ्याऐश्वर्या तमाईचीकर सहभागी होणार आहेत. .......* अग्निपंखआनंदीबाई जोशी यांनी शिक्षणाचे अग्निपंख घेऊन देशातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळविला. महिला आज नेतृत्व करू लागल्या आहेत. ट्वाल स्टोअरच्या संचालिका सुजाता चॅटर्जी, प्रसिद्ध वेडिंग डेकॉर डिझायनर गुरलीन पुरी सहभागी होणार आहेत. ......* तेजस्विनीमहिलांनी अनेक क्षेत्रांत अढळ ताऱ्याचे पद मिळविले आहे. तेजस्विनी होऊन झळाळू लागल्या आहेत. रमाबाई रानडे यांचा आदर्श त्यांच्यापुढे आहे. या विषयावरील परिसंवादात प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू, महाराष्टÑ शासनाच्या पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंघल, ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे सहभागी होणार आहेत. .....* ‘ती’ची गोष्ट महिला आज व्यक्त होऊ लागल्या आहेत. लक्ष्मीबाई टिळक यांनी दाखविलेल्या वाटेवर चालत आहेत. या विषयावरील परिसंवादात प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे, सौंदर्या शर्मा, प्रसिद्ध लेखिका श्रीमोयी पियू कुंडू, जल आणि शाश्वत विकास तज्ज्ञ (स्वीडन) रूपाली देशमुख सहभागी होणार आहेत.