पुणे : आदिवासी पाड्यांवरील मुलांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या आणि बचतगटाच्या माध्यमातून आदिवासी महिलांना सक्षम करणाऱ्या ठमाताई पवार यांना ‘ मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार’ तर ज्येष्ठ दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथा लेखिका सुमित्रा भावे यांना ‘सौ ज्योत्स्नादेवी दर्डा कार्यगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. ’लोकमत वुमन समीट’च्या आठव्या पर्वात लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ डॉ. के.एच संचेती, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ.शां.ब मुजुमदार आणि लेक्सिकन स्कूलच्या संचालिका डॉ. मोनिशा शर्मा उपस्थितीत या दोन संघर्षशालिनींचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ठमाताई पवार म्हणाल्या,मी स्वत: शिकलेले नाही. वनवासी कल्याण आश्रमात भाकरी थापता थापता पीठात अक्षर काढायला शिकले. लग्नानंतर दोन मुले झाल्यावर लिहायला शिकले. आज आदिवासी पाड्यातील स्थिती पाहिली तर महिलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक आहे. घरातली कर्ती बाईच अशी असेल तर मुलांवर काय संस्कार होणार? तिच्या आरोग्यावरही परिणाम होणारच यासाठी गावातील लोकांच्या पाठीवर मायेचा हात ठेवला. गावात भजनी मंडळे सुरू केली. दिंड्या काढल्या आणि ही व्यसनाधीनता दूर करण्याचा प्रयत्न केला. आज जो समाज भरकटलेला आहे. तो मुख्य प्रवाहात यावा अशी इच्छा आहे, त्यादृष्टीनेच प्रयत्न सुरू असून, शिक्षणानेच ही गोष्ट साध्य होणार आहे. सुमित्रा भावे यांचे मनोगत यावेळी वाचून दाखविण्यात आले. गेली जवळजवळ पस्तीस वर्षे मी चित्रपट बनवत असले तरी माझे चित्रपट ज्यांना व्यावसायिक किंवा करमणूकप्रधान म्हटले जातात त्या पठडीतील नसल्यामुळे त्यांना ग्लँमर नाही. पण तरीही लोकमत वृत्त्तसंस्थेनं माझं काम बघितलं आणि त्याचं कौतुक केलं. ही गोष्ट मला नुसती माझ्या वैयक्तिक आनंदाची वाटली नाही तर प्रगल्भ सामाजिक जाणिवेची ती खूण आहे अशी भावना त्या मनोगतातून त्यांनी मांडली. सध्याच्या काळात ‘पेड जर्नँलिझम’ हा विषय खूप चर्चेत असतो. पण आपल्या महाराष्ट्रात स्वच्छ, सकस, संवेदनशील असं काम केलं तर पत्रकार तुमचा आदर करून तुमच्या कामाला समाजासमोर आणण्यास मदत करतात हे पुन्हा एकदा अनुभवून त्याचा अभिमान वाटला असल्याचेही त्यांनी नमूद केले. या समिटची संकल्पना ‘लिव्ह टू लीड’ अशी आहे. पण सध्याचे जागतिक प्रश्न बघता महिलांनी ‘लीड टू लिव्ह’ म्हणायला हरकत नसावी. स्त्रीने नेतृत्वात पुढाकार घ्यायला हवा असं म्हणत असताना इथे स्त्री-पुरूष यांच्यातला शारीरिक भेद अभिप्रेत नाही. कारणं तसं म्हटलं तर ते विधान एकतर्फी आणि पुरूषांवर अन्यायकारक होईल. इथं शारीरिक भेद अभिप्रेत नसून गुणवैशिष्ट्य, अभिप्रेत आहे. मार्दव, सेवा, स्वत:च्या आधी दुस-याच्या सुखाचा विचार हे मातृत्वाचे गुणं म्हणजेच स्त्रीत्व! आणि निर्भयता, बुद्धिनिष्ठ, विस्तारित विचार, विज्ञानाची ओढ हे पौरूषाचे गुण म्हणता येतील. या दोन्ही गुणांची बेरीज झाल्याखेरीज समाजातील विषमता जाऊन निर्भेळ न्यायाचे, स्वातंत्र्याचे, समतेचे आणि बंधुतेचे म्हणजे मैत्रीचे वातावरण तयार होणार नाही. ही बेरीज, समतोल होण्यासाठी गुणांचे मूल्य बदलत राहावे लागेल. काळाच्या गरजेनुसार गुणांचे मूल्य बदलेल असेही विचार त्यांनी मनोगतातून समोर आणले.
लोकमत वुमेन समीट २०१९ - दोन संघर्षशालिनींचा गौरव.....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 11:47 AM
सध्याचे जागतिक प्रश्न बघता महिलांनी ‘लीड टू लिव्ह’ म्हणायला हरकत नसावी.
ठळक मुद्दे‘ मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार’ व ‘सौ ज्योत्स्नादेवी दर्डा कार्यगौरव पुरस्कार’मार्दव, सेवा, स्वत:च्या आधी दुस-याच्या सुखाचा विचार हे मातृत्वाचे गुणं निर्भयता, बुद्धिनिष्ठ, विस्तारित विचार, विज्ञानाची ओढ हे पौरूषाचे गुण