पुणे : मी चित्रपटसृष्टीत कोणाचीही जागा घ्यायला आलेले नाही की कोणी माझे स्पर्धकही नाही. मला केवळ हिरो व्हायचे आहे. हो ‘हिरो’च! कारण, हिरोला जेंडर नसते. हिरो म्हणजे आपला आदर्श. हा आदर्श स्त्रीही असू शकते. कालानुरुप संकल्पना बदलत असताना हिरो या संज्ञेतही बदल व्हायला हवेत. आज अनेक चित्रपटांच्या हिरो अभिनेत्रीच आहेत, ही परिवर्तनाची नांदीच आहे, अशा शब्दांत अभिनेत्री तापसी पन्नूने ‘लीव्ह टू लीड’ ही संकल्पना अधोरेखित केली.लोकमत वूमन समिटच्या आठव्या पर्वामध्ये अभिनेत्री तापसी पन्नूला लोकमत उमंग पुरस्काराने गौरवण्यात आले. याप्रसंगी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे अध्यक्ष विजय दर्डा, सिंबायोसिस संस्थापक अध्यक्ष डॉ. शां.ब.मुजूमदार, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.के.एच.संचेती, लेक्सिकन स्कूलच्या संचालक मोनिषा शर्मा, लोकमतचे संपादक प्रशांत दिक्षित व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी ‘तेजस्विनी’ या विषयावर आयोजित परिसंवादात तापसी म्हणाली, ‘आजही चित्रपटसृष्टीत अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मानधनामध्ये खूप तफावत आहे. एका अभिनेत्याच्या मानधनाएवढे अभिनेत्रीच्या चित्रपटाचे बजेट असते. वीकेंडला अभिनेत्याचे नाव पाहूनच पिक्चर चालतो, अभिनेत्रीचा चित्रपट मात्र आशय चांगला असेल तरच चालतो. प्रेक्षकांना अनेक वर्षांपासून असेच चित्रपट पहायची सवय लागली आहे. मी माझ्या एखाद्या चित्रपटाचे नाव सांगितले की त्यात हिरो कोण, असा प्रश्न विचारला जातो. बदल एका रात्रीत घडत नाही. मात्र, बदल घडायला किमान सुरुवात झाली आहे.’‘संघर्ष प्रत्येकालाच करावा लागतो. विशेषत:, प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न केला तर जास्त विरोध होतो. असा विरोध झाला तरी हरु नका, निराश होऊ नका. कारण, पुढील पिढीच्या उज्वल भविष्याची धुरा आपल्या हातात आहे, असा मौलिक सल्ला तिने महिलांना दिला. चित्रपटसृष्टीतील चित्रही बदलत आहेत. महिन्यातून किमान दोन नायिकाप्रधान चित्रपट प्रदर्शित होतात. महिला प्रॉडक्शन हाऊसची जबाबदारीही सांभाळत आहेत.----------नकारात्मक भूमिकेचे उदात्तीकरण नकोकबीर सिंग या चित्रपटाविषयी छेडले असता, तापसी म्हणाली, ‘चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालतो, तेव्हा तिकिटाचे पैसे केवळ पुरुषांनी भरलेले असतात का? महिलाही चित्रपट पहायला जातातच. कोणताही मनुष्य परिपूर्ण नसतो. त्यामुळे नकारात्मक भूमिका दाखवणे, उणिवा दाखवणे वाईट नाही. मीही अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या आहेत. मात्र, नकारात्मकतेचे उदात्तीकरण करणे चुकीचे आहे. या मानसिकतेला मी माझ्या चित्रपटातून नक्की प्रत्युत्तर देईन. मी हार मानणार नाही. मात्र, त्याही चित्रपटाला प्रेक्षक गर्दी करतील, अशी आशा वाटते’, अशा शब्दांत तापसी पन्नू हिने परखड मत मांडले. ----------------------स्टार आहे म्हणून...!स्टारच्या बाबतीत लोक खूप लवकर त्यांच्याविषयी काहीतरी मत बनवतात, निष्कर्ष काढतात. अशा वेळी स्वत:ची बाजू मांडण्याशिवाय पर्याय नसतो. स्टार झाल्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते. ती अभिनेत्री आहे, अशी लेबल लावली जातात. वास्तव स्वीकारुन स्वत:वर विश्वास ठेवणे पुढे जाणे हाच योग्य मार्ग असतो.----------------मी इंदिराजींना पाहिले आहे आणि आता निर्मला सीतारामन यांची वाटचालही पाहत आहे. या महिलांकडे नेतृत्व आले आणि त्या ते मनापासून जगल्या. महिलांच्या हाती नेतृत्व गेले की पुरुषांना अवघडल्यासारखे होते. महिला झोकून देऊन प्रामाणिकपणे काम करतात आणि ध्येयपूर्तीकडे जातात. महिला आपल्या कामातून तारा बनू पाहत आहेत. कामात अडचणी येणारच; मात्र, त्या मात करु शकतात. बरेचदा महिलांना महिलांकडूनच अडचणी निर्माण होतात. हे चित्र बदलायला हवे.- विजय दर्डा, अध्यक्ष, लोकमत एडिटोरियल बोर्ड
लोकमत वुमेन समीट २०१९ : महिलाही हिरोच..ही परिवर्तनाची नांदी ! तापसी पन्नू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 12:28 PM
हिरो म्हणजे आपला आदर्श. हा आदर्श स्त्रीही असू शकते.
ठळक मुद्देलोकमत उमंग पुरस्कार प्रदाननकारात्मक भूमिकेचे उदात्तीकरण नकोस्टार आहे म्हणून...!मी इंदिराजींना पाहिले आहे आणि आता निर्मला सीतारामन यांची वाटचालही पाहत आहे...