पिंपरी : महायुतीत मावळ लोकसभा मतदारसंघ नक्की कोणत्या पक्षास द्यायचा यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. मावळची जागा शिवसेनेची आहे; पण, आपण महायुती म्हणून निवडणूक लढविणार असून, महायुतीचे उमेदवार निवडून आणायचे आहेत, असे आवाहन शिंदे यांनी जिल्हाप्रमुखांना केले. जागावाटपाची चर्चा सुरू आहे, सर्वांशी चर्चा करून लवकरच उमेदवार जाहीर केले जातील, असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार जाहीर होत आहेत. मात्र, पुणे जिल्ह्यातील मावळच्या जागेवरील उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची चलबिचल वाढली आहे. सध्या येथे शिवसेनेचा खासदार आहे. मात्र, या जागेवर महायुतीतील घटक पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे शिंदे गटाची चिंता वाढली आहे. शिरूरमधील शिंदे गटाचे समर्थक माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, मावळचा निर्णय झालेला नाही.
मुंबईत शिवसेना शिंदे गटाची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, माजी मंत्री रामदास कदम, गजानन कीर्तिकर, भरत गोगावले, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर आदी उपस्थित होते.
जिल्हाप्रमुखांना सूचना
बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांना सूचना केल्या. महायुतीतील नेत्यांमध्ये काही जागांवर चर्चा सुरू आहे. जे मतदारसंघ आपले आहेत, ते मिळणार आहेत. महायुती म्हणून निवडणूक लढविली जाणार आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षातील कोणाचाही उमेदवार असो, महायुती विजयी व्हायला हवी. मावळची जागा लवकरच जाहीर होईल. महायुतीचा प्रचार करणे थांबवू नका, आपणास कोणतीही अडचण नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
- बाळासाहेब वाल्हेकर, जिल्हाप्रमुख