Loksabha Election: नाराजांची समजूत काढू, पुण्यात यश मिळवू; बाळासाहेब थाेरातांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 09:37 AM2024-03-26T09:37:26+5:302024-03-26T09:38:35+5:30
पुण्यात नव्या दमाचा गडी असून, आम्हाला यशाची खात्री आहे, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी व्यक्त केला...
पुणे : गटतट, नाराजी प्रत्येक पक्षात असते. राजकारण हा मनाचा खेळ आहे. घरात जसे असते, तसे पक्षातही चालते. त्यामुळे कोणी नाराज असतील, तर त्यांची समजूत काढू. तेही लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचे जोरदार काम करतील. पुण्यात नव्या दमाचा गडी असून, आम्हाला यशाची खात्री आहे, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी व्यक्त केला.
पुण्यातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारी घोषणेनंतर थोरात यांनी काँग्रेस भवन येथे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी निवडणूक प्रचारासाठी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करून विधानसभानिहाय सभांचे, विविध सेलच्या बैठकांचे नियोजन करतानाच जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी नियोजन करावे, अशा सूचना केल्या.
याप्रसंगी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दीप्ती चौधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, सुजाता शेट्टी यांच्यासह आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षात लोकशाही असून, एखाद्या विषयावर मतभेद असले, तरी पुन्हा एकत्र येऊन काम करण्याची क्षमताही आमच्यात आहे.
वंचित बहुजन आघाडी आमच्याबरोबर असावी, अशी आमची मनापासून इच्छा आहे. येत्या दोन दिवसांत त्यांची काय अडचण आहे, ती कशी दूर करता येईल, याबाबत आमचे प्रयत्न राहतील. दरम्यान, शिवसेनेने सांगलीत उमेदवार जाहीर केला असला, तरी सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे, अशी आमची भूमिका कायम आहे. निवडणूक पाच टप्प्यांत असल्याने भरपूर वेळ आहे, आम्ही आमचे आघाडीतील प्रश्न लवकर सोडवू आणि कामाला लागू, असेही थोरात म्हणाले.
बारामती लोकसभा मतदार संघातून आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या प्रचंड मताधिक्क्याने विजयी होतील, त्यामुळे महायुतीकडून कोण उमेदवार येतो, याची आम्हाला काळजी नाही, तसेच नगरचा उमेदवार आघाडीचा उमेदवारही चांगल्या मताने निवडून येईल, आमचा मित्रपक्ष लवकरच तो जाहीर करेल, असेही थाेरात म्हणाले.
आबा बागुल बैठकीला गैरहजर :
काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर करताच निष्ठावंतांवर अन्याय केला, असे म्हणत ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली हाेती. काँग्रेस भवन येथे साेमवारी झालेल्या नियोजन बैठकीकडेही त्यांनी पाठ फिरवल्याने राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे. ही नाराजी दूर करण्यात पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना किती यश येते, हे लवकर समाेर येईल.