पुणे : खाजगी रूग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांची तपासणी करण्यासाठी (प्री ऑडिट) आरोग्य विभागाकडून मागणी करण्यात आल्याप्रमाणे, पुन्हा शहरातील ३५ खाजगी रूग्णालयनिहाय ऑडिटरची नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा नाईक यांच्या नियंत्रणाखाली सदर ऑडिटर काम करणार आहेत. याबाबत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी गुरूवारी आदेश काढले आहेत. कोरोनाबाधितांवर उपचार करताना काही खाजगी रूग्णालयांकडून अव्वाच्यासव्वा बिले आकारली जात आहेत. दीड लाखापेक्षा अधिक बिल आकारणी केल्यास व संबंधित रूग्णाने अथवा रूग्णाच्या नातेवाईकांनी महापालिकेकडे बिलाबाबत तक्रार केल्यास त्याची पालिकेच्या ऑडिटर कडून तपासणी करण्यात येत होती. आत्तापर्यंत सव्वा कोटीहून अधिक रक्कम या ऑडिटरमार्फत कमी करून, जादा बिल आकारणी करण्यात आलेल्या रूग्णांना न्याय देण्यात आला होता.
मात्र शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कमी झाल्याने, महापालिकेकडून २५ लेखापालांसह ४० कनिष्ठ अभियंता यांची नियुक्ती पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी करण्यात आली होती. दरम्यान, आरोग्य विभागाकडे ऑडिटसाठी येणाऱ्या बिलांची संख्या लक्षात घेता, शहरातील ३५ खाजगी रूग्णालयनिहाय पुन्हा ऑडिटरची नियुक्ती केली आहे़ या निर्णयामुळे आता रूग्णांच्या नातेवाईकांना महापालिकेचे खेटे मारावे लागणार नसून, रूग्णालयनिहाय ऑडिटरमुळे अव्वाच्या सव्वा बिल आकारणी करणाऱ्या खाजगी रूग्णालयांवरही अंकुश कायम राहणार आहे.