लोणावळा (पुणे) :लोणावळा परिसरात जुन्या पुणे - मुंबई हायवेवरील तसेच मळवली, कार्ला भाजे परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येतात. शनिवारी भाजे व मनशक्ती केंद्र, वरसोली परिसरामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून गाडीतील बॅगांमधील रोख रक्कम, मोबाइल अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. या घटनेच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत आरोपीच्या तीन तासांत मुसक्या आवळल्या.
सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक व पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलिस हवालदार नितेश कवडे व पोलिस नाईक गणेश होळकर यांच्या पथकाने घटनेच्या अनुषंगाने आरोपीचा व गाडीचा शोध घेण्यासाठी प्रथम मनशक्ती केंद्र, वरसोली येथे घडलेल्या घटनेच्या ठिकाणातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. या फुटेजमध्ये इनोव्हासदृश कारमधील एक जण चारचाकी गाडीची काच फोडून चोरी करताना पोलिसांना आढळला.
या संशयित इनोव्हा कारचा वरसोली, कार्ला, मळवली, भाजे व लोहगड परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी काळ्या काचा असणारी टोयोटा कंपनीची इनोव्हा कार क्रमांक ०६ एफसी ३८०६ ही भाजे धबधबा क्रमांक २ परिसरात संशयितरीत्या फिरताना आढळली. पोलिसांनी कार चालकाकडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अखिल सलीम व्होरा (वय ३२) असे सांगितले. पोलिसांनी या कारची झडती घेतली असता कार चालकाकडे इनोव्हा गाडीमध्ये सीमकार्ड नसलेले सहा मोबाइल, तसेच पाच पर्स, दोन बॅगा व इनोव्हा कार असा एकूण बारा लाख रुपयांचा ऐवज मिळून आला. या आरोपींकडून दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनव्यतिरिक्त यापूर्वी लोणावळा शहर, कामशेत पोलिस स्टेशन हद्दीतदेखील अशा प्रकारचे गुन्हे घडलेले असून, अशा गुन्ह्यांचा कसोशीने तपास करून गुन्हा तीन तासांत उघडकीस आणला.