लोणावळा : दिवाळीच्या सलग सुट्टयांमध्ये पर्यटकाने थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळा शहराला मोठी पसंती दिल्याने आज सलग तिसर्या दिवशी लोणावळा शहर हाऊसफुल झाल्याचे चित्र पहायला मिळाले. शुक्रवारी दुपारपासून लोणावळा शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
मुंबईकरांसह गुजरात, अहमदाबाद भागातून देखील मोठ्या संख्येने पर्यटकांनी शहरात हजेरी लावली आहे. शहरातील बहुतांश हाॅटेल व खासगी बंगले तसेच विश्रामगृहांच्या बुकिंग झाल्याने व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. लोणावळा शहरातील धरणे व धबधबे यांचे पाणी कमी झाले असले तरी लायन्स पाॅईट, राजमाची पाॅईट, ड्युक्स नोज भागातील निसर्गसौंदर्य व थंड हवा याचा आनंद घेण्याकरिता पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली आहे.
एक्सप्रेस वे ने घेतला मोकळा श्वास
लोणावळा शहरांमध्ये पर्यटकांची गर्दी वाढून वाहतूक कोंडी झाली असली तरी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर महामार्ग पोलिसांच्या उत्तम नियोजनामुळे ऐन दिवाळीत एक्सप्रेस वे ने मोकळा श्वास घेतला असल्याचे चित्र पहायला मिळाले. वाहतुक कोंडी विना एक्सप्रेस वे चा प्रवास सुरु होता. रविवारी सायंकाळी व सोमवारी सकाळी पर्यटकांच्या परतीच्या वेळेस एक्सप्रेस वेवर वाहनांची होणारी संभाव्य गर्दी ध्यानात घेता गोल्डन हार्वस राबविण्यात येणार आहे. त्याकाळात घाट भागात अवजड वाहनांना प्रवेश बंद असणार असल्याची माहिती महामार्गचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी दिली.