लोणावळा : लोणावळा खंडाळा परिसरात मागील 24 तासांत 110 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाची संततधार आज देखील कायम आहे. मुंबई परिसरात पावसाने थैमान घातले असताना त्यांचा तडाखा लोणावळा खंडाळा या घाटमाथ्यावरील शहरांना देखील बसला आहे. पावसाचे आगार असलेल्या मावळ तालुक्यात काल शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून पावसाची संततधार कायम आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण देखील भरले असून डोंगर भागातून धबधबे वाहू लागले आहे.इंद्रायणी नदीच्या पात्रातील पाणी वाढले आहे. लोणावळा बाजारभाग, नांगरगाव, तुंगार्ली, वलवण येथील काही सखल भागात पाणी साचू लागले आहे. पावसाची संततधार थांबत नसल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. कोरोनाच्या संकटकाळात प्रशासनाला पावसाच्या नैसर्गिक आपत्तीचा देखील सामना करावा लागणार आहे. समाधानकारक पावसाला सुरुवात झाल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आनंदला आहे. भातरोपे मोठी झाली, मात्र भात लावणीकरिता शेतात पाणी नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मागील 24 तासांपासून सुरू असलेला पाऊस मावळात सर्वत्र झाल्याने आता शेतीच्या कामांना जोर मिळणार आहे.
मुसळधार पावसानं लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो; संततधार कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 8:13 AM