लोणावळा : वर्षापर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पुणे-मुंबईतून आलेल्या प्रचंड गर्दीमुळे लोणावळा परिसर शनिवारी हाऊसफुल झाला. तब्बल चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्याने भुशी डॅम आणि लायन्स पॉर्इंट परिसर हजारो पर्यटकांसाठी ‘नॉट रिचेबल ठरले. वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे पोलीसही हतबल झाले होते. दोन दिवसांच्या सुटीमुळे शनिवारी सकाळपासूनच लोणावळ्यात मुंबई व पुणेकर पर्यटकांची संख्या वाढली. दुपारी २:३० वाजता भुशी धरणाकडे जाणारा मार्ग कुमार चौकात बंद करण्यात आला होता. भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या जवळपास पाच ते सहा किमी अंतराच्या रांगा लागल्या होत्या. लायन्स पॉइंट ते थेट मावळा पुतळा चौकापर्यंत रांगा लागल्या होत्या. राष्ट्रीय महामार्गावरदेखील वाहनांची संख्या जास्त असल्याने दुतर्फा किमान दोन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या दुहेरी-तिहेरी रांगा लागल्या होत्या. मोठ्या प्रमाणातील वाहनांची संख्या सामावून घेण्यास लोणावळ्यातील रस्ते अपुरे पडल्याने अखेर भुशी धरणाकडे जाणारा मार्ग दुपारी २:३० वाजता बंद करण्यात आला असल्याचे लोणावळा शहर पोलिसांनी सांगितले. पर्यटकांची शहरात येणारी वाहने थेट भुशी धरण व लायन्स पॉइंटकडे जात असल्याने दुपारीच लायन्स पॉइंट ते मावळा पुतळा चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. भुशी धरणावर पर्यटकांची तोबा गर्दी झाल्याने धरण गर्दीत हरवले होते. लायन्स पॉइंट व इतर पर्यटनस्थळांवर काहीशी अशीच स्थिती निर्माण झाली होती. वाहतूककोंडी सोडविण्याचा लोणावळा पोलीस कसोशीने प्रयत्न करीत होते. मात्र वाहनांच्या रांगा हटत नसल्यामुळे तेदेखील हैराण झाले होते.- दर शनिवार व रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची होणारी गर्दी व त्यामुळे निर्माण होणारी वाहतूककोंडी यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. पाच ते दहा मिनिटांचे अंतर गाठण्यासाठी तासन्तास वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. लोणावळा शहरातील सर्व रुग्णालये बाजारपेठेत असल्याने रुग्णवाहिकांनाही रुग्ण घेऊन येताना व जाताना या वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.
लोणावळा परिसर हाऊसफुल्ल
By admin | Published: July 10, 2016 4:46 AM