लोणावळा : स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहरातील नेतृत्व, प्रशासन, नागरिक व कर्मचारी यांनी कायम सातत्य ठेवल्याने सलग चवथ्या वर्षी लोणावळा शहराने देशपातळीवर नेत्रदीपक कामगिरी केली आहे. दिल्ली येथे राष्ट्रपतींकडून लोणावळा नगरपरिषदेचा 20 नोव्हेंबर 2021 रोजी सन्मान करण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशनच्या जाॅईट सेक्रेटरी रुपा मिश्रा यांनी नुकतीच काही शहराची यादी जाहिर केली आहे. महाराष्ट्रातील विटा नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद, सासवड नगरपरिषद या तिन्ही नगरपरिषदांना दिल्ली येथील विज्ञान भवन येथे 20 नोव्हेंबर ला राष्ट्रपती च्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
देशातील शहरं स्वच्छ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून चार वर्षापुर्वी देशात स्वच्छतेची चळवळ सुरु झाली. चार वर्षापुर्वी लोणावळा शहराची ओळख ही कचरायुक्त शहर अशी होती. शहरात बघाल तेथे कचर्याचे ढिग, भरभरून वाहणार्या कचराकुंड्या अशी स्थिती होती. मात्र इच्छाशक्ती असली तर कसा सकारात्मक बदल घडू शकतो, हे लोणावळा नगरपरिषदेने कृतीतून दाखवून दिले. केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा नगरपरिषदेने पहिल्या वर्षी भाग घेत प्रचंड कामे केली. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांना तत्कालीन उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी भक्कम पाठिंबा दिला तर तत्कालीन मुख्याधिकारी सचिन पवार यांनी लोणावळा शहराला स्वच्छ करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांची टिम कार्यान्वित केली. प्रशासनाने ठरविले तर शहराचा विकास कसा होऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. पहिल्याच वर्षी लोणावळा शहराने देशात सातवा क्रमांक मिळवला. पण त्यानंतर शांत बसेल ते लोणावळा शहर कसले, त्यांनी लोणावळा शहरात स्वच्छता जागर सुरु केला. शहरातील सर्व कचराकुंड्या काढत लोणावळा शहराला कचराकुंडी मुक्त शहर केले. वरसोली येथील कचरा डेपो हा महाराष्ट्रातील अद्यावत कचरा डेपो करत त्याठिकाणी बायोगॅस व खत निर्मिती प्रकल्प सुरु केला. घरोघरचा कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या सुरु केल्या, त्यावरील नगराध्यक्षा यांच्या सूचनांनी लोणावळाकरांची पहाट होऊ लागली. तत्कालीन मुख्याधिकारी रवि पवार, विद्यमान मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी हा जागर कायम ठेवला.
सलग चार वेळा शहराचा क्रमांक कायम राखण्यात यश
लोकप्रतिनिधी, शहरातील विविध सामाजिक संघटना, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी, शहरातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी यांना सोबत घेत स्वच्छता जनजागृती मोहिम, माझे शहर माझी जबाबदारी हे घोषवाक्य घेत शहरात सातत्यपूर्ण चळवळ राबविल्याने सलग चार वर्ष लोणावळा शहराने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात नामांकन मिळवत आपल्या नावाचा डंका कायम ठेवला आहे. मागील चार वर्षातील क्रमांक प्राप्त शहराचा विचार करता तो व्यक्ती केंद्रित असल्याने त्यामध्ये सातत्य दिसून आले नाही. लोणावळा शहरात मात्र शहर केंद्रित विकास झाल्याने सलग चार वेळा शहराचा क्रमांक कायम राखण्यात यश आले आहे.